‘एक झाड लावू दारी-विठुरायाला नमस्कार करी’; ‘यंदीची वारी घरच्या घरी’!

0
IMG-20200622-WA0022

एक झाड लावू दारी-विठुरायाला नमस्कार करी’; यंदीची वारी घरच्या घरी’!

पंढरपूर, दि. २२ जून २०२०

सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनी वृक्षलागवडीसाठी यावेळी आपला मोर्चा वारकऱ्यांकडे वळवला आहे. कोरोनामुळे यंदाच्या आषाढी वारीला सर्व वारकऱ्यांना पंढरीत येऊन विठोबाचे दर्शन घेणे शक्य नाही. मग आपल्या घरीच नुसते हात जोडून विठोबाला नमस्कार करण्याबरोबर विठ्ठलाच्या नावाने एक झाड लावा, तुमची वारी सार्थकी लागेल, असे आवाहन सिनेअभिनेते व सह्याद्री वनराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केले आहे.

वारकऱ्यांना यंदा करोनामुळे आषाढी वारीला येता आले नाही याचे दु:ख आहे. हे दु:ख विसरायचे असेल तर जो वृक्ष आपणाला जगण्याची उर्जा देतो. त्याची आपल्या दारात, शेतात, गावात लागवड करुन त्याची पांडुरंग परमात्मा म्हणून पूजा करा व जसे रोज तुळशीला पाणी घालता तसे त्या वृक्षाला घाला. झाडे लावताना वड, पिंपळ, लिंब, चिंच, उंबर, आंबा, आवळा, जांभूळ या देशी झाडांची लागवड करा, असेही शिंदे यांनी सांगितले.

सह्याद्री वनराई संस्था, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या वतीने श्री क्षेत्र देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी तळावर सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्थ शिवाजी मोरे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे अध्यक्ष अॅड विकास ढगे पाटील, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे, सोहळा प्रमुख अजित मोरे, महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्यासह गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *