यंदा दिवाळीचा बार फुसकाच !
मुंबई महापालिकेची दिवाळीत फटाके फोडण्यास मनाई.
मुंबई, दि. ९ नोव्हेंबर:
दिवाळी दोन तीन दिवसावर आली असली तरी यंदा दिवाळीचा बार फुसकाच ठरेल असे दिसत आहे. कोरोनामुळे फटाके फोडण्यासह, फराळासाठी एकत्र जमण्यावरही निर्बंध आले आहेत. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच फटाके फोडण्यास महानगरपालिकेने परवानगी दिली आहे.
महानगरपालिकेने जारी केलेल्या नियमावलीनुसार, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी केवळ आपल्या घराच्या पटांगणातच फटाके फोडावे तेही फुलबाजी, अनार, झाड यासारखेच… हे करतानाही कोरोनासंदर्भातील आवश्यक ती खबरदारी घ्यायची आहे.
मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे आणि साबणाने हात स्वच्छ धुणे याकडे लक्ष देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या सावटामुळे दिवाळीच्या काळात फराळासाठी मित्र, नातेवाईकांच्या घरी एकत्र जमून फराळावर ताव मारण्यांवरही निर्बंध आहेत आणि भाऊबिजही ऑनलाईनच करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
