महाराष्ट्रात कोरोनाची संभाव्य दुसरी लाट नाही पण….
महाराष्ट्रात कोरोनाची संभाव्य दुसरी लाट नाही पण….
मुंबई, दि. ५ नोव्हेंबर :
राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्यतो येणार नाही मात्र संभाव्य लाटेसाठी खबरदारीची उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सध्या राज्यात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत त्यात खंड पडणार नसून त्याउलट अधिक प्रभावीपणे ५०० लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर भर दिला जाणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे .
राज्यात सध्या कोरोनासाठी ज्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत तसेच जी सुविधा निर्माण करण्यात आली आहे ती कायम ठेऊन त्या अजून वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णयही कायम राहील. त्याचप्रमाणे टास्क फोर्सने जे आदर्श उपचार कार्यपद्धती तयारी करून दिली आहे त्यानुसार उपचार करण्याचे राजेश टोपे यांनी आवाहन केले आहे.
थंडीमध्ये इन्फ्लुएन्झासारखे आजार वाढतात. त्यामुळे तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांचे लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधान्य देण्याचे समितीने सुचविले आहे. त्यानुसार राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये आयसीयूमधील डॉक्टर्स, नर्स यांची कमतरता लक्षात घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना सिम्युलेशन लॅबच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली.कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.ज्या रुग्णालयांमध्ये मृत्यू दर अधिक आहे त्याठिकाणी रुग्णालयस्तरावरच डेथ ऑडीटी कमिटी नेमून शासनाला अहवाल देण्याचे यावेळी तज्ज्ञांनी सांगितले.
