20201105_185704

शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळालीच पाहिजे.
कोल्हापूर, दि. ५ नोव्हेंबर:

केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना देशभरातून तीव्र विरोध होत आहे. काँग्रेसही या कायद्याविरोधात आंदोलनात उतरली आहे तर दुसरीकडे अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली कृषी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही आज रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला.सांगली-कोल्हापूर हायवेवरील उदगाव टोल नाक्याजवळ आज आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी खासदार राजू शेटटी यांना या कायद्याचा खरपूर समाचार घेतला. शेट्टी म्हणाले की, मोदी सरकारने एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहक या दोघांचाही विश्वासघात केला आहे. भांडवलदारांच्या घशात शेती घालण्याचा हा डाव असून या निर्णयाला देशभरातून विरोध आहे. सरकारने तातडीने हे कृषी कायदे माघारी घेऊन शेतक-यांना किमान वैधानिक किमतीची हमी द्यावी.
संसदेत खासदारांचा विरोध असतानाही पाशवी बहुमताच्या बळावर भाजपने भांडवलादारांना शेतीतून पैसा मिळावा, यासाठीच हे कायदे शेतक-यांवर लादले आहेत. येणा-या काळात धान्य खरेदीच्या जबाबदारीतून सरकार बाहेर पडणार. त्यानंतर खासगी कंपन्या भाव पाडून शेतीमाल खरेदी करणार आणि विक्री करताना भाव वाढवून ग्राहकांची लूट करणार असे शेट्टी म्हणाले.
सर्व शेतीमालासाठी किमान वैधानिक किंमत मिळालीच पाहिजे. हा भाव न देणा-यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अशी तरतूद नवीन कायद्यांमध्ये केलेली नाही. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे केंद्र सरकारला कोणत्याही परिस्थितीत हे कायदे रद्द करावेच लागतील, असेही शेट्टी यांनी म्हणाले.

यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एक रकमी एफआरपी आणि दोनशे रुपये अधिक दर मिळावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. रास्ता रोको आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *