गावागावात शिवसेना झाली पाहिजे!
सातारा, दि. 2 नोव्हेंबर :
शिवसेना हा पक्ष तळागाळातील माणसांसाठी काम करणारा जनसामान्यांचा पक्ष असून गावागावात शिवसेनेच्या वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सातारा जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले.
सामंत म्हणाले, पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सातारा व कोल्हापूर जिल्ह्याची संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे. ही जबाबदारी दिल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत जिल्ह्यातील शिवसैनिकांना भेटण्यासाठी मी आलो आहे. आपला पक्ष अधिक मजबूत बनविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास मी उपलब्ध आहे.
पक्ष आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी सोडविणे आणि शासनाच्या योजना गरजू नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी याची मदत होईल. तसेच आपल्याकडे तरूणांची संख्या अधिक असल्याकारणाने त्यांनाही युवा सेनेच्या माध्यमातून सोबत घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुका तसेच गावपातळीवर जाऊन काम करणे आवश्यक आहे. हे काम करीत असताना पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शिसेनेत गटतट नसतात इथे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ शिवसेना हाच एकमेव गट काम करतो असे सामंत म्हणाले म.
मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आम्ही महाराष्ट्रातले सर्वच मंत्री काळ्या फिती लावून काम करत आहोत. सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा म्हणून काळी फित बांधत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा आम्ही या माध्यमातून निषेध करत आहोत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सीमा भागविषयी केलेले वक्तव्य अत्यंत बालीशपणाचे असून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. सीमा भागामध्ये लवकरच शैक्षणिक संकुल सुरू होणार आहे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, आ.महेश शिंदे, उपनेते नितीन बानुगडे पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव, मा.आ.सदाभाऊ सपकाळ व शिवसैनिक उपस्थित होते.
