शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा!
जळगाव, दि. 1 नोव्हेंबर:
बळीराजाची फसवणूक टाळण्यासाठी आगामी अधिवेशनामध्ये विशेष कायदा करण्यात येईल आणि असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
अमळनेरच्या कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी काम करीत आहेत. बळीराजाच्या हिताला राज्य शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळून त्यांना संरक्षण मिळण्यासाठी विशेष कायदा आणण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल.
जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे एस आर पी एफ च्या बटालियन चे काम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल.महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखणे, दोषींवर कारवाई करुन त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आंध्रप्रदेश राज्याच्या धर्तीवर कायदा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाने राज्यातील पोलीसांच्या वसाहतींसाठी पहिल्या टप्प्यातच 750 कोटी रुपयांची तरतूद केली असून, राज्यातील पोलिस वसाहतींच्या प्रस्तावांना टप्प्याटप्प्याने मंजुरी देऊन या वसाहती गतीने पूर्ण करणार असून जळगाव जिल्ह्यातील पोलीसांचे व पोलीस दलाचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
