कणखर पंतप्रधान इंदिरा गांधींचा स्मृतिदिन.

0
20201031_113713

मुंबई, दि. ३१ :

माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखत देशाला ‘महासत्ता’ बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचं नेतृत्वं, कर्तृत्वं, त्याग, बलिदानाचं योगदान सर्वाधिक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचं स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त केली.
स्वर्गीय इंदिराजींच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात व स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत इंदिराजी व गांधी-नेहरु घराण्यानं दिलेलं योगदान, केलेल्या त्यागाबद्दल देशवासीय त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञ राहतील. इंदिराजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. तुरुंगवास भोगला. पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासाचा पाया भक्कम केला.

पाकिस्तानची फाळणी करुन स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती हे त्यांची दूरदृष्टी, राजकीय कौशल्यं, साहसी नेतृत्वाचं आगळंवेगळं उदाहरण आहे. आशियाई खेळांचं आयोजन असो की, अलिप्त राष्ट्रांचं नेतृत्वं करण्याची क्षमता, इंदिराजींच्या अनेक निर्णयांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा गौरव वाढवला. देशाच्या एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या सर्वकालिन महान नेतृत्वास कृतज्ञतापूर्वक अभिवादन, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *