दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा विचार!

0
20201030_183740

मुंबई, दि. ३० ऑक्टोबर:
कोरोनामुळे बंद करण्यात आलेले एक एक व्यवहार सुरु करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. अनलॉकच्या या प्रक्रियेत शाळा कॉलेज सुरु करण्यास मात्र अजून परवानगी देण्यात आलेली नाही. आता दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोनाची स्थिती पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा विचार आहे. सुरुवातीला ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात विचार केला जाईल. हे विद्यार्थी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग आहेत. तसेच त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे आहे. त्यामुळे या वर्गाच्या शाळा सुरु करण्यास प्राधान्य दिले जाईल.

कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंदच आहेत.१५ जूनपासून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरु करण्यात आले असले तरी शाळा मात्र सुरु करण्यात आलेल्या नाहीत. राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के हजेरीस गुरुवारी परवानगी दिली आहे. कोरोना संदर्भातील स्वच्छतेच्या सर्व नियम व अटींचे पालून करुनच शाळा सुरु करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. ११ वीच्या प्रवेशासंदर्भातही चर्चा सुरु असून कायदेशीर सल्ला घेऊन त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *