… आता घंटाबाज हिंदुत्ववाद्यांची थोबाडे बंद का?
मुंबई, दि. 30 ऑक्टोबर :
हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला कोंडीत पकडले आहे.बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनावेळी पोलीस गोळीबारात एक जण ठार झाला व काहीजण जखमी झाले. या घटनेवर शिवसेनेने सामनामधून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सामानाच्या अग्रलेखात म्हटले आहे, ‘हाच गोंधळ, हिंसाचार व पोलिसी गोळीबार प. बंगाल, महाराष्ट्रात घडला असता तर ‘घंटा बजाव’छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंगानाच घातला असता. मग आता मुंगेरमधील गोळीबारावर घंटाबाज हिंदुत्ववाद्यांची थोबाडे बंद का आहेत? मुंगेरमध्ये हिंदूंचे रक्त सांडलेय. त्याविरोधात कधी घंटा बडवणार? निदान थाळ्या तरी वाजवा.
‘महाराष्ट्र किंवा प. बंगालसारख्या राज्यात असे काही घडले असते तर भाजपवाल्यांनी हिंदुत्वावर हल्ला असल्याचे सांगून थयथयाट केला असता. राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली असती. गेला बाजार या गोळीबाराची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजप शिष्टमंडळ राजभवनात चहापानास गेले असते. पण मुंगेरच्या रस्त्यावर भर मिरवणुकीत दुर्गा प्रतिमेची खेचाखेच पोलिसांनी केली. त्या खेचाखेचीत बेगडी हिंदुत्ववाद्यांची पीतांबरे अद्याप सुटली कशी नाहीत?
‘पालघरमध्ये दोन साधूंची जमावाने हत्या केली, पण त्या हत्येने महाराष्ट्रातील साधुवाद, हिंदुत्व वगैरे सगळं संपलं. शिवसेना ‘सेक्युलर’ झाली अशी आवई उठवली गेली. काही वृत्तवाहिन्यांनी त्या दुर्दैवी साधूंची ढाल पुढे करून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न निर्माण केले. आज मुंगेरला दुर्गापूजेवर पोलिसी गोळीबार होऊनही हे भुंकणारे व किंकाळ्या मारणारे थंडच आहेत. नितीशकुमारांचे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावा, असा सूर बिहारातील भाजपवाल्यांनी काढलेला दिसत नाही.
मुंगेरातील दुर्गा प्रतिमेचा अवमान व गोळीबार म्हणजे ‘जंगलराज’ आहे असं या ढोंगी डोमकावळ्यांना वाटू नये याचं आश्चर्य वाटतं,’ असा घणाघात शिवसेनेने केला आहे.
