दोन दिवसात वीज बिलामध्ये दिलासा द्या !
राजभवनवर राज ठाकरे आणि राज्यपाल!
मुंबई, दि. २९ ऑक्टोबर:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन जाऊन भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारने लोकांना भरमसाठ वीज बिलं देऊन लूट केली आहे त्यातून दिलासा मिळावा यासाठी सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती राज ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते वीज बिल प्रकरणी आंदोलन करत आहेत. अदानी, बीएसटीचे लोक भेटून गेले. वीज बिल कमी करु शकतो पण एमईआरसीने मान्यता दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे. पक्षाचे एक शिष्टमंडळ जाऊन एमईआरसीच्या लोकांना भेटून आले. त्यांच्याकडून पत्रही आलं आहे. पण निर्णय काही होत नाही.
ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही लवकरात लवकर निर्णय घेऊ असे सांगितले होते. लोकांना जिथे २००० रुपये बिल येत होते तिथे १० हजार बिल आले. राज्य सरकारला हे सर्व माहित आहे परंतु निर्णय तात्काळ घ्यायला पाहजे. त्याच्यासाठी राज्यपालांना निवदेन दिले आहे. शरद पवार यांच्याशीही या विषयावर बोलणार आहे आणि वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांनाही भेटू. एका छोट्या निर्णयासाठी एवढे दिवस लागतात याला काय अर्थ आहे. सरकार आणि राज्यपालांचे फार सख्य असल्याने विषय किती पुढे जातील कल्पना नाही पण ते सरकारसमोर हा विषय मांडतील, असे राज ठाकरे म्हणाले.
