ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ, संप मागे!

0
20201028_142717

पुणे, दि. 28 ऑक्टोबर :
ऊस तोडणी कामगारांना यंदाची दिवाळी गोड जाणार आहे. ऊसतोड कामगारांना, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी १४ टक्क्यांनी वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ऊस कामगारांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा होऊन मजुरी वाढवण्याचा निर्णय झाला त्यानंतर संपही मागे घेण्यात आला.

ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरवाढीबाबत दर तीन वर्षांनी करार करण्यात येतो. यावर्षीचा करार हा २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे. या करारानुसार ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत सरासरी १४ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या कामगारांना सरासरी ३५ ते ४५ रुपयांनी मजुरी वाढवून मिळणार आहे.

बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखान्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. या निर्णयाला बैठकीत संबंधित सर्व संघटनांनी मान्यता दिली आहे. ऊस तोडणी कामगारांनी पुकारलेला संप यासोबतच मागे घेतला आहे, असे साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले

या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर संघाचे संजय खताळ यांच्यासह राज्यातील विविध ऊस तोड संघटनांचे प्रतिनिधी राज्य सहकारी महासंघाचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *