मुंबईत कोरोनाचे नवे हॉटस्पॉट; उत्तर मुंबईत टाळेबंदी!
मुंबईत कोरोनाचे नवे हॉटस्पॉट; उत्तर मुंबईत टाळेबंदी!
मुंबई: दि. २१ जून २०२०
धारावीसारखा भाग कोरोनाच्या विळख्यातून सावरत असताना मुंबईतील इतर भाग मात्र कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत आहेत. उत्तर मुंबई सध्या कोरोनाचे हॉस्टस्पॉट बनले असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबई महापालिकेने उत्तर मुंबईत संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. कांदिवली ते दहिसर दरम्यानची ११५ प्रतिबंधित क्षेत्रे आणि ९०८ टाळेबंद इमारतींवर पालिकेचे लक्ष आहे. उत्तर मुंबईत जीवनावश्यक वस्तू वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या भागातील कांदिवली, बोरिवली, दहिसर या परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. आजघडीला कांदिवलीमध्ये २०९०, मालाडमध्ये ३३७८, बोरिवलीमध्ये १८२५, तर दहिसरमध्ये १२७४ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. रुग्ण दुपटीचा काळ कांदिवलीत २५, मालाडमध्ये १९, बोरिवलीत १८, तर दहिसरमध्ये १५ दिवस आहे.
प्रतिबंधित क्षेत्रांतील रहिवासी नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आले आहे. आततता मात्र नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतीत रुग्ण सापडल्यास ती संपूर्ण इमारत टाळेबंद करण्यात येईल. तसेच तेथील दुकानेही बंदच राहतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
कोकणीपाडा, तानाजीनगर, शिवाजीनगर, क्रांतीनगर, कुरार, दिंडोशी, आप्पापाडा, पिंपरी पाडा, संतोषनगर या परिसरात टाळेबंदी करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. उत्तर मुंबईमधील ३४ वस्त्यांत संपूर्ण टाळेबंदी करण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा दोन ते तीन वस्त्या असून तेथे राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. नियम न पाळणाऱ्या ८०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई आणखी कडक करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.
