बिहारचे अहंकारी नितीश सरकार घालवा!
नवी दिल्ली, दि. 27 ऑक्टोबर:
बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियाही पार पडली आहे. जदयु-भाजपा विरुद्ध काँग्रेस-राजद आघाडी असा सामना बिहारमध्ये आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजदचे तेजस्वी यादव, मुख्यमंत्री नितीशकुमार, काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या प्रचारसभा झाल्या. प्रकृतीच्या कारणाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी प्रचार सभा घेऊ शकत नाहीत परंतु आज त्यांनी एका व्हिडिओ संदेशमधून बिहारच्या जनतेला नितीशकुमार कुमार यांचे अहंकारी सरकार घालवा असे आवाहन केले.
सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार व बिहार मधील नितीशकुमार सरकारवर तोफ डागली. ‘बिहार मधील सरकार अहंकारात डुबलेले आहे, या अहंकारी सरकारला बदलण्याची वेळ आली आहे. शेतकरी, कामगार, तरुण वर्गाची या सरकारने घोर निराशा केली आहे. बिहारमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे या सरकारचे अपयश आहे. बिहारच्या जनतेला आता बदल हवा असून ते आता काँग्रेस आघाडीसोबत आहेत.’
दिल्लीतील सरकार हे बंदी सरकार आहे. या सरकारने नोटबंदी, शेतीबंदी, टाळेबंदी, व्यापार बंदी, आर्थिक बंदी, रोजगार बंदी केली आहे. या बंदी सरकारविरोधात बिहारमधील जनता एकजूट झाली आहे. आता नवे विचार आणि नवी शक्ती निर्माण झाली असून नव्या भारताचा अध्याय लिहिण्याची हीच वेळ आहे.
बिहारची जनता बेरोजगारी, स्थलांतर, महागाई , यामुळे त्रस्त आहे. या सरकारच्या काळात दलित आणि महादलित यांच्या सह मागासवर्गीय जातींची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. असा घणाघात सोनिया गांधी यांनी केला आहे.
