आपत्तीग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज!
दिवाळीच्या आधी मदत मिळणार
मुंबई, दि. २३ ऑक्टोबर:
ठाकरे सरकारने आज मोठी घोषणा केली आहे. मराठवाडा व राज्याच्या काही भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीच्या आधी ही मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
जिरायत आणि बागायत नुकसानग्रस्तांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निकषानुसार दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करुन ही मदत जाहीर केली आहे. हेक्टरी १० हजार रुपये, फळपीकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये. रस्ते आणि पुलांसाठी २ हजार ६३५ कोटी, पाणी पुरवठ्यासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे.
केंद्र सरकारकडून हक्काचे ३८ हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. केंद्राचे पथकही अजून पाहणीसाठी आले नाही तरिही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत सरकारने हे पॅकेज जाहीर केले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
