फिल्मसिटीतील शूटिंगच्या भाड्यात 25% सुट!
मुंबई, दि. 23 ऑक्टोबर:
कोविडमुळे बंद असलेल्या शूटींगला 25 जूननंतर परवानगी देण्यात आली आहे परंतु या काळात अनेक चित्रपट आणि मालिका निर्मात्यांनी चित्रनगरीत स्टुडिओ चित्रीकरणासाठी आरक्षित केले होते. मात्र लॉकडाऊनमुळे चित्रीकरण होऊ शकले नसल्याने भाड्यामध्ये सूट मिळावी अशी मागणी संघटनानी केली होती. या मागणीला अनुसरुनच चित्रनगरीत चित्रीकरण करणाऱ्या निर्मात्यांना 25 टक्क्यांपर्यंत भाड्यामध्ये सवलत किंवा चित्रीकरणासाठी नव्याने तारखा देण्यात येणार आहेत.
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या (फिल्मसिटी) संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा सांस्कृतिक निर्णय घेण्यात आला.
चित्रनगरीसाठी तांत्रिक तज्ञ आणि कुशल मनुष्यबळ यांची नियुक्ती आणि पॅनेल तयार करणे, सलग चित्रीकरण करणाऱ्या निर्मात्यांना चित्रीकरण दरात सवलत देणे, चित्रनगरी येथे मुख्य सुरक्षा कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक करणे,चित्रनगरीमध्ये उपहारगृह सुरु करणे, वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप सुरु करणे, चित्रनगरीच्या भाडे सवलती पध्दतीत सुधारणा करणे आणि चित्रनगरीचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे अशा विविध मुद्यांवर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणाले, आज मनोरंजन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. असे असल्याने याबाबतचे धोरण असणे गरजेचे आहे. चित्रपट, मालिका, ओटीटी यांच्यासह रंगमंच, लोककला, माहितीपट, जाहिरातपट यांचा या धोरणात समावेश करण्यात येणार असून दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत या धोरणाचे प्रारुप तयार करण्यात यावे. धोरणाचे प्रारुप सांस्कृतिक कार्य विभागाला सादर केल्यानंतर हे धोरण मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल.
मनोरंजन क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार मिळत असल्याने या क्षेत्रास उद्योग क्षेत्राचा दर्जा मिळण्याबरोबरच लघु आणि मध्यम उद्योगांना मिळणाऱ्या सवलती मिळणे आवश्यक आहे. या क्षेत्रास उद्योग क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठीही सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.
