‘त्या’ ऐतिहासिक सभेनंतरची रात्र आणि पुढे..!
मुंबई, दि, २२ ऑक्टोबर:
साताऱ्यातील ती भर पावसातली सभा संपली…राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उशीरा आले अन् पाच-सात मिनिटेच बोलले..फार असं ‘भारी’ काही बोलले नाहीत, त्यांचं आपलं नेहमीचंच..टीका कम आवाहन…उदयनराजे फितुरी करुन गेल्याने कडवटपणा अधिक..पण भारी होती त्यांची देहबोली, लढण्याची वृत्ती आणि जिगर; जी एकूण प्रचार काळात कायम होती. ऐंशी वर्षांचा तरुण लढवय्या अशी त्यांची तयार होऊ लागलेली इमेज या सभेने अधिक ठळक केली..सभा संपल्यानंतर काय घडलं..?
सभा संपल्यानंतर ते लगेच पुण्याला निघणार आहेत, कार्यक्रम पत्रिकेत तर तसं नमूद होतं.निरोपही तसाच होता..पावसात बराच काळ ताटकळलेले जिल्ह्यातील नेते केव्हाचेच पांगले..त्यांच्या दृष्टीने, ‘चला संपली एकदाची सभा’… उदयनराजे भाजपमध्ये गेल्याने सार्वजनिक,वैयक्तीक आणि पक्षीय पातळीवर खुन्नस निघणार, हीच काय ती त्यांना खुशी..! बाकी राज्याचा विचार केला तर काहीही आशा नाही, अशी सगळ्यांचीच पक्की भावना..!’ पक्षाध्यक्षांनी उगीच पाटणची सभा ठेवली, थेट साता-यात आले असते तर पावसातला जनसमुदाय असा वेठीस धरला गेला नसता,आले तरी बोलले केवढंसं’ असं काही मागच्या दारानं विधीमंडळात गेलेल्या नेत्यांनी बोलूनही दाखवलं..समोर श्रोत्यांमध्ये चैतन्य होतं, तुलनेत पवार वगळता व्यासपीठावर निरुत्साह होता, त्यामुळे सभा संपताच सगळे निघाले. शरद पवार यांची गाडीही हायवेला लागली, लेफ्ट मारला की पुण्याकडे निघायचे, पण तेवढ्यात शशिकांत शिंदेंना त्यांनी फोन केला आणि गाडीने राईट मारला. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता भोगून ऐन निवडणुकीत तळ्यापेक्षा मळ्यात अधिक दिसणारे प्रभाकर घार्गे यांच्या हायवे वरील प्रीती हॉटेलकडे गाडी वळली. तिथे अर्थातच तातडीने व्यवस्था झाली.
आवरता आवरता अकरा वाजायला आले, डॉक्टरांना आधीच निरोप गेला होता- ते लगबगीने आलेही.साहेबांचे दोन्ही पाय सुजलले होते… ‘..ते तसेच असतात..’ डॉक्टरांनी विचारण्याआधीच त्यांनी स्मितहस्य करत उत्तर दिले, जखमा असल्याने त्यांच्या पायांना पट्ट्या बांधलेल्या असतात- पावसात त्या भिजल्या होत्या, त्या सोडून-जखमा साफ करुन डॉक्टरांनी पुन्हा बांधल्या..रक्तदाब तपासला- आ..नॉर्मल..!! बाकी ठिक आहे, असे पवारसाहेब बोलले आणि डॉक्टर बाजुला झाले..इतका काळ पवारसाहेब शांत होते, मनात काहीतरी चालले होतं- बहुदा सभेचं..कदाचित उद्याचं नियोजन..? पण ते त्यावर एक शब्द बोलले नाही…रुममध्ये त्यांच्या पीएसह चार माणसं..शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते आणि इतर दोघे, पवारसाहेबांनी स्वत:च बॅगेतून रात्रीचा ड्रेस काढला- कॉटनचा साधा पांढरा सदरा आणि विजार- मागच्या पिढीची वडीलधारी मंडळी घालतात तो ड्रेस.. त्यांच्या पीएने रेस्टॉरंटच्या मॅनेजरला आधीच निरोप दिला होता..तसा तो येऊन उभा होता, ऑर्डर दिली- बारा वाजत आले होते..शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस..कुणीतरी माहिती दिली, साहेबांच्या परवानगीने केक आला.साहेब होते त्याच खोलीत काही मिनिटात वाढदिवस साजरा झाला. घाबरतच शिंदेंनी पवारसाहेबांना केक दिला. त्यांनी थोडासा तुकडा खाल्ला.
‘ मी उद्या सकाळी सहाला निघणार आहे’, असे ते बोलले. हा इशारा घेत सगळे रुममधून निघाले..साहेबांसाठी दाल-खिचडीची ऑर्डर गेली होतीच..तत्पूर्वी एकट्याचा नेमका पण छान कार्यक्रम..! साहेबांनी सगळे असताना सभेचं नावही काढलं नव्हतं, जणू जो हुवा जाने दो..अब जो करना है, वो देखते है..हा भाव..साहेबांसह तिथल्या कुणालाही अंदाज नव्हता की बाहेर काय धुमाकूळ सुरु झाला आहे..!
दुसऱ्या म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रोहित पवार यांच्यासाठी दुपारी १२ वाजताची सभा होती. ते सकाळी ६ वाजता आवरून तयारही झाले.इतर उपस्थित नेते कालचा शिणवटा चेहऱ्यावर घेऊन धडपडत खाली आले.गाडी पुण्याच्या दिशेला रवाना झाली..पीएने मिळतील ते पेपर आधीच मागवले होते.ते त्यांनी गाडीत वाचायला घेतले, पावसातल्या सभेच्या जोरदार हेडलाईन होत्या, सभेचं वर्णन काय सांगावे…! पण स्थानिक माध्यमात ते त्यांना स्वाभाविक वाटलं, त्यात सातारा, थोडं अधिक कौतुकाची सवय..पण त्यानंतर प्रवासात सुप्रियाताईंनी फोन करुन माहिती दिली, सोशल आणि मुख्य माध्यमातूनही देशभर या सभेची चर्चा सुरु आहे. त्यांच्या लढाऊ वृत्तीचे सर्वत्र कौतुक होतं आहे..तसं पीएने मोबाईलवर रिकॉर्डेड न्यूज़ बुलेटीन लावलं..एक दोन लिंक पाहुन त्यांच्या चेहऱ्यावर तेच चिरपरिचित स्मितहास्य पसरलं..
आयुष्यभर इतक्या निवडणूका लढवलेला नेता, अनुभव प्रचंड-म्हणून त्यांना अंदाज आला असेल का की, ही सभा सगळं बदलून टाकणार आहे..? वाटत नाही..पण ते मनापासून सर्वोच्च प्रयत्न करत होते..एवढं नक्की..संपुर्ण निवडणुकीत त्यांनी शस्त्र टाकलं नव्हतं. सगळी स्थिती पुर्ण बदलून जाईल अशी शक्यता त्यांना वाटली नसेलच..कारण लोकसभेचा अनुभव फार ताजा होता, फार तर ही खात्री वाटली असेल की, किमान होणारे नुकसान टाळता येईल..मागच्या जागांच्या आसपास राहु..निकाल काहीही येऊ देत, नव्या पिढीच्या नजरेत आपली प्रतिमा बदलली हीच काय ती सुखद भावना तेव्हा निर्माण झाली असेल..आयुष्यभर विरोधक विशेषत: संघाने अपप्रचार करुन रंगवलेल्या चित्राचा सगळा काळा रंग धुवून गेला आहे, याची जाणीव होऊन आनंद वाटला असेल..पण सगळंच बदलून गेलं, सत्ता आली, अशक्य वाटत होतं ते शक्य झालं..!
अशा त्या गेल्यावर्षीच्या, १८ ऑक्टोबर २०१९च्या सभेची वर्षपुर्ती धुमधडाक्यात साजरी केली गेली. अनेकांनी आठवणींचा तसाच चिंब पाऊस पाडला. भावनिक विषयांना हात घालणे अथवा तसे विषय चिंगम सारखे चगळत राहून शक्य तेवढा राजकीय फायदा घेण्याचे भाजपेयी कसब आता सर्वानीच अंगीकारले आहे. त्यातलाच हा एक प्रकार… आपल्या नेत्याबद्दल भरभरुन सांगता येईल अशी उत्तुंग कामगिरी असतानाही अजगरासारखा सुस्त पडून राहीलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करायला हवा.अपवाद वगळता विधानसभा निवडणुकीत हत्यारंही न उचललेले सगळे आता सत्तेची उब घेत आहेत. जन्मापासून सत्तेत असलेल्या या पक्षाचे अनेक शिलेदार तत्कालीन सत्ताधारी भाजपमध्ये गेले, भाजपची सत्ता आली नाही. मग ते आता सत्तेत आलेल्या ‘घटस्फोटीत नवऱ्यासोबत’ अनैतिक संबंध ठेवून आहेत. लपुन छपुन सत्तेचं सुख घेत आहेत- खरं तर वाईट काळात साथ सोडलेल्यांबाबत पक्षाने ठाम असं वेगळं धोरण घ्यायला हवं होतं..कुणाच्या मनात-डोक्यात काय होतं, पदं भोगून कुणी कसा पाठीत खंजीर मारला..हे सगळंच स्पष्ट झालं आहे- अनेकजण गेल्याने अनेकांना संधी मिळाली, पक्षाचा साचलेला प्रवाह मोकळा झाला..हे वास्तव स्विकारून टिपिकल बेरजेचे राजकारण बाजुला ठेवून भाकरी फिरवावी, नवी थापावी..नव्या पिढीला अशीच संधी द्यावी..पण तसं न होता जुने प्रेमसंबंध जपले जात आहेत, आहे तिथे सुखी रहा..हे धोरण काहींना लागू आहे, पण ते सरसकट असायला हवं..अन्यथा जे वाईट काळात सोबत राहिले त्या नेत्या-कार्यकर्त्यांवर हा थेट अन्याय आहे..असा अन्याय सुरुही झाला आहे..
भाजपच्या सत्ता काळात सरसकट काही मोजके अपवाद वगळता सगळा विरोधी पक्ष शांत होता, तेव्हा सामाजिक न्यायाची लढाई लढणारे नेते- कार्यकर्ते- नागरिक- लेखक- कलाकार- पत्रकार यांच्या अपेक्षेनुसार वाटचाल सुरु आहे का..? समाजाचे धार्मिक-जातीय ध्रुवीकरण झालेले असताना, भलेही सत्य असेल पण एक एक गोष्ट जनतेपर्यंत पोहोचवताना प्रचंड कष्ट उपसावे लागत होते, एवढा अपप्रचार झालेला होता. प्रतिमा खालावली होती..राज्यकारभार करण्याची पद्धत आणि चुका..तसेच सत्ता डोक्यात गेल्यानेही हे घडलं होतं..मधल्या काळात जो मोठा अनुभव मिळाला, तो गाठीशी ठेवून पुन्हा सत्ता आल्यावर वागणं बदलणं अपेक्षित आहे, तसा बदल झाला आहे का..? याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे.. डोक्यात हवा अद्याप नसेल..कोरोनामुळे नीट कामही करता येत नसेल पण जहरी खोटा प्रचार रोखण्याची, गैरसमज दूर करुन जनतेला सत्य सांगण्याची यंत्रणा उभी केली गेली आहे का..? सत्ता चालवण्याची पद्धती बदलली आहे का..? सत्तेभोवती असलेली ती जुनी भाटगिरी करणारी गँग दूर ठेवलीय का ..? या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही अशी आहेत. आपला मतदार पक्का करण्याची, त्याला सुरक्षित करण्याची- खऱ्या खोट्याची लढाई जिंकुन वैचारिक आधारावर पिढी निर्माण करण्याची कोणतीही व्यवस्था निर्माण करण्यात आलेली नाही..अपघाताने मिळालेली सत्ता कर्तृत्वाने मिळाली आहे, असे मानणारे धन्य आहेत. फार तर ही सत्ता शरद पवार यांच्या कष्टाने आणि नंतरच्या व्युहरचनेमुळे मिळाली असे मानता येईल..पण कायम असे होत नसतं..
विचाराने कार्यकर्ते निर्माण होतील यासाठी काम करावे लागेल, जे कधी केलं गेलं नाही- फक्त शिवाजी-शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेतले गेले, यांचे विचार नव्या पिढीला पोहचवण्याची काहीच व्यवस्था नाही- हे महापुरुष भाजपने कधीचेच हायजॅक केलेत- उद्या ते सर्व हिंदुत्ववादी होते अशी मांडणी झाली, आश्चर्य वाटू नये, संघ-भाजपने मतदार निर्माण करण्यासाठी नीट व्यवस्था केली आहे. मतदार, कार्यकर्ते घडवले जातातच, इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांसाठीही वेगळं नियोजन आहे. संघाच्या वर्गात त्यांना प्रवेश घ्यावा लागतो. संघ त्यांच्या बुद्धीवर काम करतोय. संधीसाधूपणा करत अनेकजण भाजपमध्ये गेले पण तिथे सहज काही कुणी देईना..! काहींना आधी काम करावे लागतेय तर काहींना पदं मिळाल्यानंतर..! पण राबावे लागतेय..कुणी राजे, कुणी सहकार महर्षी तर कुणी माजी मुख्यमंत्री….जीवनभर ज्या पक्षात होते तिथे सहज पदं मिळाली, तिथे कधीही काहीही काम न करणारे भाजपमध्ये मात्र काम करताना दिसत आहेत..पूर्वी आपल्याच पक्षाला शिव्या दिल्या तरी चालायचे..भाजपमध्ये ते लाड काही चालत नाहीत..!
मुळात शरद पवार यांनी आतापर्यंत केलेले काम जरी पक्षाने नव्या पिढीपर्यंत पोहोचवले तरी तो पाऊस दिवस साजरा करण्याची गरज पडणार नाही. जो सन्मान हवा आहे तो ही मिळेल. त्या मतदारालाही आपण योग्य नेत्याला पाठिंबा दिल्याची भावना निर्माण होईल.असंख्य असे निर्णय आहेत की जे सत्तेत असताना पवार यांनी घेतले, जे क्रांतीकारी आहेत, त्याचा फायदा सगळ्यांना मिळाला- देशात त्यांच्या एवढे मोठे धोरणात्मक निर्णय घेणारा दुसरा राज्यकर्ता आजतरी कुणी नाही, जे निर्णय इतर राज्यांनी आणि केंद्र सरकारने देशपातळीवर लागू केले, हे सगळं नव्या पिढीला माहिती नाही..तुलनेत आरएसएसने त्यांची रंगवलेली भ्रष्टाचाराचा महामेरु ही प्रतिमा अधिक ठळक आहे, या प्रतिमेवरुन केल्या जात असलेल्या विनोदात सहज पवार भक्तही सामील होतात, एवढा प्रचंड प्रचार त्यांच्या विरोधात केला गेलाय..पवार आता लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही ती प्रतिमा पुसण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत नाही..हे खरंच मोठं आश्चर्य आहे..!
(लेखक- वरिष्ठ पत्रकार रफीक मुल्ला)
