IMG-20201021-WA0050

सांगली, दि २१ ऑक्टोबर:.

अतिवृष्टीने झोडपून काढल्याने सांगली जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले. शेतकरी मायबाप सरकारकडून मदतीची अपेक्षा बाळगून आहे, पण या असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही. सरकार येण्यापूर्वी बांधावर जाऊन उध्दव ठाकरे यांनी जे वचन शेतकऱ्यांना दिले होते त्या वचनाची आता सरकारमध्ये वचन पूर्ती करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात शेतीचे नुकसान झाले. पूल, बंधारे आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने दळणवळण ठप्प आहे. शेतिसहित डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. मका, सोयाबीन, भुईमूग, भात या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी माजी राज्यमंत्री सदा भाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार धनंजय गाडगीळ, जिल्हा अध्यक्ष मा आमदार पृथ्वीराज देशमुख आदी पाहणी दौ-यात उपस्थित होते.

दरेकर यांनी सांगतिले की, आज शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे पण सरकार पंचनामाच्या फेऱ्यात अडकली आहे. आतापर्यंत फक्त १० ते १२ टक्के पंचनामे झाले आहेत. अशा गतीने काम चालत राहिले तर शेतकऱ्यांना दिलासा कसं मिळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ऐन सुगीच्या दिवसात आलेल्या पावसाने शेतक-यांच्या हंगामावर पाणी फिरवले. आमची सरकारकडे तीन मागण्या आहेत. पहिली मागणी पंचनामे करत बसण्यापेक्षा फोटो ग्राह्य धरून सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. डाळिंबाच्या बागांबाबत काही निकष याठिकाणी आहेत. सलग पाच दिवस २५ मिलिमीटर पाऊस पडला तर नुकसान भरपाईचा त्यामध्ये अंतर्भाव आहे. या ठिकाणी रोज १५० ते २०० मिली लिटर पाऊस पडल्यामुळे जर शेती उद्ध्वस्त झाली असेल तर तो निकष लागू होत नाही. त्यामुळे याबाबतीत लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकरी आज पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना ५ लाख पर्यंत कर्जमाफी द्यावी किंवा त्यांचे कर्ज रीस्ट्रक्चर करावे. कारण कर्ज न फेडल्यामुळे त्यांना बँकेकडून पुन्हा कर्ज मिळणार नाही यासाठी त्यांना पाच लाखाची कर्जमाफी द्यावी किंवा त्यांचे कर्ज रीस्ट्रक्चर करावे अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.

सरकारकडून आम्ही काही मोठी मागणी करत नाही आहोत फक्त सरकारने आपली वचनाची पूर्ती करावी. सरकार येण्यापूर्वी परभणी दौऱ्यावर आलेल्या उध्दव ठाकरे यांनी बागायती शेतीसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची तर कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याचे वचन दिले होते. त्यामुळे आता सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी बागायतदार शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळ बागायतदारांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी अशी आमची मागणी आहे.

सण तोंडावर असताना आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून पडले आहेत. या स्थितीत प्रत्यक्ष मदतीची गरज असताना सरकारकडून केवळ पाहणीचा फार्स सुरू असल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची आवश्यकता आहे.आज अतिवृष्टीमुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या जमिनीत पुन्हा पिक उगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना खर्च करावे लागणार त्यासाठी सरकारने दीर्घकालीन उपाययोजना करून शेतकऱ्यांना मदत करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *