महिलांना लोकल प्रवासाची मुभा !
मुंबई, दि. १६ ऑक्टोबर:
ठाकरे सरकारने मुंबईतील महिलांना नवरात्रीची गोड बातमी दिली आहे. मुंबईसह एएमआर भागातील महिलांना उद्या शनिवार पासून लोकलने प्रवास करता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात वाजेपासून पुढे शेवटच्या लोकलपर्यंत महिलांना हा प्रवास करता येणार आहे. यासाठी महिलांना क्यू आर कोडची आवश्यकताही नाही.
मुंबई लोकल २२ मार्चपासून बंद होती. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती मात्र सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश नव्हता. त्यामुळे सामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत होते. रस्त्यावरच्या ट्रॅफिकमुळे मुंबईत पोहचण्यासाठी तीन तासांचा अवधी लागत होता. मनसेसह इतरही पक्षांनी मुंबई लोकल सामान्यांसाठी खुली करावी अशी मागणी लावून धरली होती.
अनलाॅक करत राज्य सरकार जनजीवन पूर्ववत करत आहे. त्याचाच भाग म्हणून दुकानं, आस्थापना, एसटी, फार, हाॅटेल उघडण्यास परवानगी दिली आहे. आता महिलांनाही लोकल प्रवासाची परवानगी देऊन सरकारने दिलासा दिला आहे.
