भाजपाच्या बॉलिवूड ड्रग कनेक्शनची चौकशी करा!
एनसीबीने तपास केला नाही तर मुंबई पोलीस तपास करतील.
मुंबई, दि. १६ ऑक्टोबर २०२०:
अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी तीन-तीन तपास यंत्रणांनी चौकशी करुनही काहीच निष्पन्न झाले नाही. एनसीबीची चौकशीसुद्धा जनतेची दिशाभूल करण्याकरता केली गेली आणि ती फार्सच ठरली. या प्रकरणात भाजपाचा ड्रग अँगल आला होता आणि मोदींच्या बायोपीक निर्मात्यांचे नावही चर्चेत आले होते म्हणून बॉलीवूड व भाजपा ड्रग कनेक्शनची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने ३१ ऑगस्ट २०२० रोजी केली होती त्या मागणीचा पुनरुच्चार करण्यासाठी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले की, हे ड्रग कनेक्शनचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे असे गृहमंत्री यांनी म्हटले असून विवेक ओबेरॉयचे भाजपाशी घनिष्ठ संबंध आहेत, ते भाजपाचे स्टार प्रचारक राहिले आहेत. या अगोदर या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे राष्ट्रीय तपास यंत्रणांना विनंती करण्यात आली होती, परंतु या तपास यंत्रणांवर मोठा दबाव असल्याचे दिसते, तरीदेखील पुन्हा एनसीबीकडे या मागणीचा पुनरुच्चार केला जाईल आणि त्यांनी चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस चौकशी करतील, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे, अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली.
सावंत पुढे म्हणाले की, भाजपा व बॉलिवूड ड्रग कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे हे राज्य सरकारतर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपवले होते परंतु या माहिती अन्वये एनसीबीने अद्याप चौकशी केलेली नाही. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपीक निर्मात्याचे नाव येत होते. त्या निर्मात्याची चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील केली होती परंतु त्या दिशेने तपासच केला गेला नाही. राज्य सरकारने विनंती करुनही याचा तपास केला गेला नाही. या संदर्भात संदिप सिंह व विवेक ओबेरॉय यांचे नाव येत होते. ड्रग कनेक्शन संदर्भात बंगळूरु पोलिसांनी मुंबईत येऊन अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापे मारले परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांना वेळ मिळत नाही हे आश्चर्याचे आहे.
