सोलापुरला अतिवृष्टीचा मोठा फटका!
सोलापूर, दि. १५ ऑक्टोबर:
राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून सोलापूर, पुणे, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्याना मोठा फटका बसलेला आहे.
सोलापूर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यातील ५६५ गावांना पुरचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील भीमा, सीना, निरा, बोरी, भोगावती, नागझरी या नद्यांना पूर आला आहे. पूर आल्यामुळे जिल्ह्यातील १७९ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
मोहोळ, बार्शी, अक्कलकोट, माढा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांना अतिवृष्टी व पुराचा मोठा फटका बसला आहे. बेगमपूरच्या पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे. सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने सीना व भोगावती नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
शेकडो जनावरे पाण्यात अडकली आहेत. कांदा
सोयाबीन, ऊस, डाळींब, द्राक्षांसह सर्व पिकं वाहून गेली आहेत. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
केले आहे.
मोहोळ तालुक्यातील सीना नदीच्या काळावरील गावांनाही या पुराचा फटका बसला आहे. हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावातही भयंकर स्थिती आहे.
अकलूज येथे निरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
मागील तीन चार दिवसापासून सतत पडणा-या मुसळधार पाऊस आणि वीर व भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे निरा नदीला पूर आला आहे.
जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, एनडीआरएफच्या तुकड्या युद्धपातळीवर काम करत आहेत. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
