तेलंगण व आंध्रातही पावसाचे धुमशान,३० ठार!

0
20201015_164523

हैदराबाद, १५ ऑक्टोबर:
परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात धुमाकुळ घालणाऱ्या या पावसाचा जोरदार तडाखा तेलंगण व आंध्र प्रदेशालही बसला आहे. या मुसळधार पावसाने तेलंगण व आंध्र प्रदेशात मिळून ३० लोकांचा बळी घेतला आहे.

तेलंगणची राजधानी हैदराबाद शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी शिरले आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. हॉस्पिटल्स आणि पोलिस स्टेशनमध्येही पावसाचे पाणी शिरले. हैदराबाद-विजयवाडा हायवेवरही भरपूर पाणी साचले होते. जुन्या हैदराबाद शहरात पाणी साचले आहे. तसेच चादरघाट, मुशरामबाग, दिलसुखनगर, उप्पल,
वनस्थलीपुरम भाग अजूनही पाण्याखाली आहेत. हैदराबाद शहर व आसपासच्या परिसरात पुराने थैमान घातले असून एनडीआरएफ, लष्कर, डीआरएफ चै पथकं जनतेला मदत करत आहेत. घरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला. हैदराबाद शहरात ऑक्टोबर महिन्यात १०० वर्षानंतर एवढा प्रचंड पाऊस पडला आहे.

आंध्र प्रदेशातही मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले आहे. आंध्रातील गंभीर परिस्थिती पाहता मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. अधिकाऱ्यांनी हाय अॅलर्टवर राहावे आणि मदत शिबिरांमध्ये आश्रय घेणाऱ्या पीडित नागरिकांना आवश्यक ती मदत देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मुसळधार पावसामुळे आंध्रात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मदत व बचाव कार्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *