नागपूरच्या अनुसंधान केंद्राचा विस्तार!

0
IMG_20201014_121534

मुंबई, दि. 14 ऑक्टोबर  :
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या अनुसंधान केंद्राचा विस्तार देशातील अग्रगण्य वैद्यकीय रुग्णालयाच्या धर्तीवर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग पुढाकार घेणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रामध्ये 971 खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय व नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार संस्था सुरु करण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

देशमुख म्हणाले की, राज्यातील कोविड-19 बाबतची पार्श्वभूमी पाहता महाराष्ट्राच्या उपराजधानीत सुसज्ज वैद्यकीय रुग्णालय उभारणे आवश्यक आहे.  वैद्यकीय शिक्षण विभाग सामाजिक न्याय विभागाच्या मदतीने प्रयत्न करणार असून याबाबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात येणारे सर्वांत मोठे रुग्णालय ठरणार असून यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सामाजिक न्याय विभाग समन्वयाने काम करावे.

नागपूरचे पालकमंत्री डॉ.राऊत म्हणाले की, सध्या हे रुग्णालय बाह्यरुग्ण विभागापुरते मर्यादित असून हे रुग्णालय लवकर सुरु झाल्यास पूर्व, उत्तर नागपूरसह ग्रामीण आणि सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे. रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा सुद्धा उपलब्ध असल्याने रुग्णालय उभारणीच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. या रुग्णालयासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित उपाययोजनेतून नियतव्यय देण्यात येणार असल्याने या विभागाने निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास गती द्यावी.

येथे 2005 पासून बाह्य रुग्ण विभाग कार्यरत आहे पंरतु  आंतररुग्ण सेवेसाठी इमारत व सोयी नसल्याने आजारी रुग्णांना इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात येते. त्यामुळे संस्थेच्या उर्वरित जागेत रुग्णालयाचे बांधकाम लवकर पूर्ण करण्याला गती देण्यात येणे आवश्यक असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *