राज्यपालांची पत्रातील भाषा धक्कादायक!

0
20201013_204150

खा. शरद पवार यांचे पंतप्रधान मोदींना पत्र.

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर:
राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यपालांच्या पत्रावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनीही राज्यपाल यांच्या पत्राला सडेतोड उत्तर दिले आहे परंतु आता यात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.
शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, “राज्यपालांचे एखाद्या मुद्द्यावर स्वतंत्र मत असू शकते हे मला मान्य आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपले मत व्यक्त केले याचेही कौतुक आहे. पण मीडियामध्ये हे पत्र प्रसिद्ध होणे आणि ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती पाहून आपल्याला धक्का बसला आहे,”
“पत्रात वापरण्यात आलेल्या अयोग्य भाषेची तुम्हीही दखल घेतली असेल याची खात्री आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जणू काही एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला लिहिले आहे असे वाटत आहे. लोकशाहीत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मुक्त संवाद झाला पाहिजे यावर माझा विश्वास आहे. मात्र मते आणि भूमिका मांडताना पदाचा मान राखला गेला पाहिजे. घटनाक्रम पाहता मुख्यमंत्र्यांकडे आपले उत्तर मीडियामध्ये प्रसिद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे,”
“मी या मुद्यावर मुख्यमंत्री किंवा राज्यपालांशी चर्चा केलेली नाही. मात्र राज्यपालांच्या वागण्याने आपल्याला दुख: झालं असून तो खेद तुमच्यासमोर व्यक्त करत आहेत,” असं शरद पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *