धक्कादायक: साडेबारा लाख RTPCR किट्स सदोष !
जालना, दि. १३ ऑक्टोबर :
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारही मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत आहे मात्र यात यात कधी जम्बो कोवीड सेंटरमधील भ्रष्टाचार, तिथला भोंगळ कारभार तर रुग्णालयात मृतदेहांची विटंबना करण्याचे प्रकार पहायला मिळाले. खाजगी रुग्णालयाने तर कोरोनाच्या काळात लूटच लावली आहे. या सर्वांना आळा घालण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. आता यातील मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरलेली किट्सच सदोष असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या सदोष कीट्स तब्बल साडेबारा लाख एवढ्या मोठ्या संख्येच्या आहेत. ही माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ” जीसीसी बायोटेक या कंपनीच्या माध्यमातून राज्यभरात वितरित झालेल्या किट्समध्ये मोठ्या प्रमाणात लो पॉझिटिव्हिटी रेट आढळला आहे. एनआयव्हीचा असा अहवाल आहे की या किट्स सदोष आहेत. कोरोनाचे संक्रमण झाले आहे की नाही यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचणीसाठी आरटी पीसीआर किट्स आवश्यक असतात. सदोष आरटी पीसीआर किट्समुळे चाचणी सदोष येऊ शकते. अशा परिस्थितीत चाचण्यांचे निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून काही काळासाठी एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्याव्यात आणि चाचण्या सुरु ठेवण्यात याव्यात असा निर्णय झाला आहे.
असे असले तरी कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी सुरु असलेल्या चाचण्या थांबविल्या जाणार नाहीत. या सर्व चाचण्या एनआयव्हीकडून करण्यात येतील. तसेच, राज्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत किंवा घडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती काळजी घेण्यात येईल, असेही राजेश टोपे म्हणाले.
