राज्यातील मंदिरं बंदच राहणार !
मुंबई, दि. 11 ऑक्टोबर:
राज्यातील ठाकरे सरकार अनलाॅकच्या माध्यमातून एक एक करत परवानगी देत आहे. एसटी सुरू झाली आहे, होटेल, बार, दुकानं उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. परंतु मंदिरं उघडण्यास आजपर्यंत परवानगी दिलेली नाही. आजही जनतेला संबोधित करताना त्यांनी इतक्यात मंदिरं उघडली जाणार नाहीत हे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मंदिराच्या विषयावर मी हळूवार जातोय. काही जण म्हणतात, तुम्ही हे उघडलं, ते उघडलं नाही. जबाबदारी तुमच्यावर नाही आमच्यावर आहे, त्यापेक्षाही जनतेवर आमचं प्रेम आहे. उगाच तंगडयात तंगड घालून, गोष्टी बंद ठेवण्याची आमची मानसिकता नाही’.
‘आता नवरात्री येत आहे, त्यानंतर दिवाळी आहे. खूप काळजीपूर्वक एक-एक पाऊल टाकावे लागणार आहे. उघडलेल्या दरवाजातून सुबत्ता, समृद्धी आली पाहिजे, करोना नको, तरच त्या उघडलेल्या दरवाजाला अर्थ आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
मंदिरं उघडा अशी मागणी भाजपा, मनसे, वंचित आघाडी या राजकीय पक्षांसह, वारकरी व अध्यात्मिक क्षेतातूनही केली जात आहे. दारूची दुकानं उघडता मग मंदिर का नाही असा प्रश्नही विचारला जात आहे. पण सध्या तरी मंदिरं बंदच ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला आहे.
