गांधीजींची विचारसरणी जगभर पोहोचवण्याची गरज
वर्धा, दि 10 ऑक्टोबर :
महात्मा गांधींचे विचार 21 व्या शतकातही प्रासंगिक आहेत. गांधीजींच्या विचारातील साधेपणा, मानवता आणि अहिंसा संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याची गरज आहे. गांधी हा एक विचार आहे आणि केवळ गांधीजींच्या विचारांनीच मानवी आयुष्यात आणि समाजात बदल घडवून आणता येऊ शकतो, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याणमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने महात्मा गांधी यांची 151 व्या जयंती निमित्त वर्धेत 2 ऑक्टोबरपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या गालिब सभागृहात ‘विश्व सभ्यतेसाठी महात्मा गांधी यांची प्रासंगिकता’ या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी केदार यांच्या हस्ते ‘एकविसाव्या शतकातील आचार्य विनोबा भावेंची प्रासंगिकता’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, प्र.कुलगुरू प्रा.हनुमान प्रसाद शुक्ल, व प्रा. चंद्रकांत रागीट आणि जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री उपस्थित होते. लंडन, दक्षिण आफ्रिका, उझबेकिस्तान, मॉरिशस, नेपाळ आणि लिथुआनियासारख्या देशांच्या अभ्यासकांनी वेबिनारमध्ये विचार मांडले.
पालकमंत्री केदार म्हणाले, गांधीनी दाखविलेल्या मार्गावर आपण मार्गक्रमण करून गावांचा विकास करण्यावर भर दिला पाहिजे. गांधीजींच्या अहिंसक तत्वाची शक्ती सर्व जगाने अनुभवली आहे. गांधीजींनी अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे पालकमंत्री केदार यांनी सांगितले.
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी, बीजभाषणात म्हणाले, १५० वर्षांनंतरही संपूर्ण जग गांधींच्या विचारांनी प्रेरित आहे. गांधीजी त्यांचे काम आणि विचारांमुळे अजूनही प्रासंगिक आहेत. गांधी विचारच सध्याच्या आव्हानांना सकारात्मक आणि समाधानकारक उत्तर असल्याचे मत त्यांनी मांडले.
