शिखर बँक घोटाळा प्रकरणी दादांना दिलासा!
मुंबई, दि. ७ ऑक्टोबर:
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चीट दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.
शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेनं बर्खास्त केलेल्या संचालक मंडळात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह बड्या नेत्यांचा समावेश होता. या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
शिखर बँकेच्या संचालक मंडळाने नियमांचे उल्लंघन करत कर्जवाटप केल्याने बँकेला आर्थिक फटका बसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. अजित पवार, हसन मुश्रीफ, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ यांच्यासह विविध पक्षांतील ६९ बड्या नेत्यांचा या संचालक मंडळात समावेश होता. रिझर्व्ह बँकेनं यात हस्तक्षेप करत हे संचालक मंडळ बरखास्त केलं होतं व चौकशीचे आदेश दिले होते. कालांतरानं या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या क्लोजर रिपोर्टला विरोध केला आहे.
