आता शेतकरी चिंतामुक्त होणार !
कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर:
कृषी कायद्यावरून देशभरात शेतकरी व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. काँग्रेस, अकाली दलासह अनेक राजकीय पक्षांचाही या कृषी कायद्याला तीव्र विरोध असून आंदोलने केली जात आहेत. मोदी सरकारने आणलेले कायदे हे शेतकरीविरोधी असून या कायद्यामुळे व्यापारी गब्बर होतील, किमान आधारभूत किमतीचा आधारच या कायद्यात नसल्याने शेतमाल कवडीमोल भावाने व्यापारी खेरदी करतील अशी भीती व्यक्त केली जात असताना भाजपाचे मंत्री हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असून काँग्रेससारखे पक्ष विनाकारण राजकारण करत आहेत, असा आरोप करत आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असून त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानेव यांनी म्हटले आहे.
दानवे म्हणाले की, “स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारकडे येऊन दहा वर्षे झाली तरीही तत्कालीन काँग्रेस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मोदी सरकारने शेतकरी हित समोर ठेवून धडाधड निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सुधारित कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले, आता शेतकरी चिंतामुक्त होणार आहे. त्याच्या मालाचे मार्केटिंग करण्याचा अधिकार मिळालेला असल्याने योग्य भाव मिळणार आहे.”
दानवे पुढे म्हणतात, “नवीन कायद्यामुळे बाजार समित्या बंद पडतील अशी पोकळ आवई विरोधी पक्ष उठवत आहेत परंतु या निर्णयामुळे देशातील एकही बाजार समिती बंद पडणार नाही. उलट देशभरातील व्यापारी माल खरेदी करण्यासाठी बाजार समितीत येतील हेच काँग्रेसचे दुखणे आहे. बाजार समितीमधील आपली मक्तेदारी नष्ट होईल याची त्यांना भीती वाटत आहे,” असा आरोपही त्यांनी केला आहे.
