डॉ. ज्योती वाघमारेंना शिवसेनेची राज्यसभा.
मुंबई, ता. ५ मार्च २०२६
शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे खासदार संसदरत्न डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय शिरसाट,आमदार डॉ. मनिषा कायंदे, ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. आणि प्रमुख नेते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली राज्यसभेची उमेदवारी ही राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे, अशी भावना डॉ. ज्योती वाघमारे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माझ्या सारख्या गरिब कुटुंबातील मुलीला, डॉ. भीमरावांच्या मुलीला दिलेला हा न्याय आहे. माझी उमेदवारी ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची, सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची आणि संविधानाने आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे.
आपल्या आई वडिलांना राज्यसभा काय हे माहित नाही आणि त्यांना सांगून देखील खरं वाटणार नाही. जातीपातीच्या भिंती मोडून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ करेन, असा विश्वास व्यक्त करत डॉ. वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना मंत्री, खासदार, आमदार यांचे आभार मानले.
डॉ. ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूरच्या असून त्यांनी इंग्रजी साहित्यात PHd केली आहे. त्यांनी वालचंद महाविद्यालयात १० वर्ष प्राध्यापिका म्हणून काम केले. डॉ. वाघमारे यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून तसेच काहीकाळ बांधकाम मजूर म्हणून काम केले.
पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या, शाळेत अनवाणी जाऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्योती यांनी दहावी तसेच बारावीत परीक्षेत चांगले गुण मिळवले. उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने डॉ. वाघमारे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली आहेत.









