छ. संभाजी महाराजांचे संगमेश्वरचे स्मारक कधी ?
चिपळूण, दि. १ मार्च २६ ;
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील स्मारकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. मुख्यमंत्री व मंत्र्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे स्मारक करण्याच्या घोषणा अनेकवेळा केल्या पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, हे भाजपा महायुती सरकारच्या करंटेपणाचे लक्षण आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सपकाळ पुढे म्हणाले की, संभाजी महाराज यांचे स्मारक न करण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशाची भिती वाटत आहे, संभाजी महाराजांच्या स्मारकामुळे मुख्यमंत्र्यांच्या ‘विचारांना’ अडचण होईल, अशी भिती तर त्यांना वाटत नाही ना, असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
लक्ष्मी ऑरगॅनिक्स प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध..
कोकणात येणारा लक्ष्मी ऑरगॅनिक्स या इटली मधील घातक प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा विरोध असून या प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. इटलीमध्ये बंद पडलेल्या या केमिकल कंपनीचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे कोकणातील पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस पक्ष हा प्रश्न विधिमंडळातही उपस्थित करणार आहे व कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही, असे स्पष्ट करताना, कोकणातील मंत्री या प्रकल्पाविरोधात आवाज का उठवत नाहीत. दररोज हिंदु-मुस्लीम वाद उभा करण्यासाठी तोंड उघडणारे मंत्री लक्ष्मी ऑरगॅनिक्स प्रकल्पाबाबत गप्प का आहेत, अशी विचारणाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.









