BJP चे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा:

BJP चे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा:

चिपळूण, दि. १ मार्च २०२६

काँग्रेस पक्षाने देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष राजकारण करत आला आहे पण मागील १२ वर्षापासून भारतीय जनता पक्ष देशात हिंदु मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.

 

कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी कार्यशाळेची सांगता झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, माजी आमदार मोकल, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड गणेश पाटील, प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के, रत्नागिरी उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, प्रदेश उपाध्यक्ष आबा दळवी, प्रदेश सरचिटणीस गुरबिंदर सिंग बच्छर, शशांक बावचकर, ॲड. श्रद्धा ठाकूर, रत्नागिरी जिल्हा समन्वयक सुरेश कातकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

चिपळूणमधील शिबिराच्या सांगता कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना प्रभारी रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, निवडणुकीत जय पराजय होत असतात, पराभवाने खचून न जाता काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर द्या. तालुका, जिल्हा, ब्लॉक, वार्ड, बुथ स्तरावर संघटना मजबूत करा व आपले नेते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे हात मजबूत करा. काँग्रेसचा शिपाई म्हणून लढा, काँग्रेस पक्षाला नक्की गतवैभव प्राप्त होतील असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

Leave a Comment