स्व. अजित पवारांना विधानसभेत काँग्रेसची श्रद्धांजली.
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी –
महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत शिस्तप्रिय, कार्यक्षम आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले कणखर नेतृत्व, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक पर्व संपुष्टात आले. प्रशासनावर जरब आणि कामाचा वेग ही त्यांची ओळख कायमची जनमानसात कोरली गेली आहे, या शब्दात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहली.
विधानसभेत आज अजित पवार यांचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अजित पवार यांची कारकीर्द ही संघर्षातून आणि कर्तृत्वातून उभी राहिली होती. १९८२ मध्ये सहकारी साखर कारखान्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास सहा वेळा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडून त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक नियोजनाला एक नवी दिशा दिली. दादांचा शब्द म्हणजे कामाची पावती हे समीकरण त्यांनी आपल्या कार्यशैलीतून सिद्ध केले होते. अजित पवार यांचे वडील कमी वयात गेले त्यामुळे त्यांच्या वागण्यात कठोरता होती,असे वडेट्टीवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणारे दादा खऱ्या अर्थाने ‘अजातशत्रू’ नेते होते. आपल्या पक्षातील नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप झाले तरी त्यांना सांभाळून घेणारे अजितदादा पवार होते ही आठवण वडेट्टीवार यांनी सांगितली.
विधानसभा निवडणुकीत ‘बटोगे तो कटोगे’ सारख्या विधानांना अजित पवार यांनी विरोध केला.त्यांनी नेहमीच पुरोगामी महाराष्ट्राचा बाणा जपला. अल्पसंख्याक समाजाच्या मनात विश्वास निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
राजकारणात विरोधक असूनही वैयक्तिक नात्यात दादांनी कधीच कटुता आणली नाही. विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देतानाही त्यांनी विकासाची कामे थांबवली नाहीत. त्यांच्या स्वभावातील कडकपणा हा केवळ शिस्तीसाठी होता, मात्र आतून ते अत्यंत हळवे आणि संवेदनशील होते. आदरणीय शरद पवार साहेबांवरील त्यांची श्रद्धा आणि कुटुंबाप्रती असलेले प्रेम वारंवार दिसून आले, अस काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.
विविध खात्यांमध्ये काम करताना अजित पवार यांचा अनुभव मोठा होता.त्यांच्याबरोबर राज्यमंत्री म्हणून काम करताना खूप शिकायला मिळाले. अजित दादा मिटिंगची तयारी करून यायचे, अधिकाऱ्यांना देखील त्यामुळे अभ्यास करायला लागायचा. लोडशेडींग मुक्त महाराष्ट्र, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना आणि कोरोना काळातील आर्थिक नियोजन यांतून दादांनी आपली प्रशासकीय पकड सिद्ध केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अजित दादा यांचे स्वप्न अपूर्ण राहिले, ही खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
शोकप्रस्तावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील आणि आता अजितदादा यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचे, पक्षाचे आणि त्यापेक्षा ही मोठे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे.
या कठीण प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंब, विशेषतः त्यांच्या मातोश्री, सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय पवार यांच्या दुःखात संपूर्ण महाराष्ट्र सहभागी आहे या शब्दात वडेट्टीवार यांनी विधानसभेत श्रद्धांजली अर्पण केली.









