कोविडच्या संकटात महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी.
महाराष्ट्रातील जनतेच्या संयमामुळे हे शक्य झाले.. वेल डन महाराष्ट्र ! जयंत पाटील
मुंबई दि. १६ जून २०२०
महाराष्ट्रात कोविड १९ च्या रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी असताना दोन तीन दिवसापासून दिलासादायक चित्र दिसत असून कोविड १९ चे रुग्ण बरे होऊन घऱी परतण्याची संख्या वाढत आहे. राज्यात सोमवारी एकाच दिवशी ५ हजार ७१ कोविड रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. हे चित्र दिलासादायक असून राज्यातील जनता व अहोरात्र झटणाऱ्या प्रशासनाचे हे श्रेय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनतेच्या संयमामुळेच हे शक्य झाले…वेल डन महाराष्ट्र! अशा शब्दात जयंत पाटील यांनी ट्वीट करून समाधान व्यक्त केले आहे. जयंत पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरा आरोग्य विभागाची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाल्यावर ट्वीट केले होते. एकाच दिवशी ५ हजार ७१ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून यात ४ हजार २४२ रुग्ण हे मुंबई शहर व उपनगरातील आहेत. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील जनतेच्या संयमामुळे, प्रशासनावरील विश्वासामुळे हे शक्य झाले आहे, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राज्याने दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण राज्यात आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
