अजित पवारांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा.
अजित पवारांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा.
मुंबई, दि. ५ फेब्रुवारी २६..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले आहे पण ब्लॅकबॉक्स मधील संभाषण अद्याप जाहीर झालेले नाही व चौकशीही होत नाही, हा विलंब अनाकलनीय आहे, त्यामुळे संशय बळावत चालला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली नाही. शपथविधीला जेवढी घाई केली तेवढी अपघाताच्या चौकशीसाठी करण्यात आली नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सपकाळ पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्यासारख्या शिस्तप्रिय लोकनेत्याच्या बाबतीत असा अपघात व्हावा हे पटत नाही. जोपर्यंत या अपघाताचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही तोपर्यंत असे प्रश्न उपस्थित होतच राहणार. या अपघाताने अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत आणि सरकार हे प्रकरण ज्यापद्धतीने हाताळत आहे त्यावर शंका आणखी वाढत आहेत. अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी एक पत्र तातडीने केंद्रीय मंत्र्याला पाठवले व त्याचे उत्तरही आले आणि तेथेच हे प्रकरण थांबल्याने पाणी कुठेतरी मुरतेय असे सपकाळ म्हणाले.
एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. कोयता गँग, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, आका, खोके आणि बिश्नोई गँग हे त्याचेच परिणाम आहेत. सरकारच अशा प्रवृत्तींना खतपाणी घालत आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
