माघी पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त मलंगगड भगवामय..

0
IMG-20260202-WA0072

माघी पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त मलंगगड भगवामय..

ठाणे, दि. २ फेब्रुवारी :

मलंगगडावरील काही बांधकामाबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात लवकरच अपेक्षित असलेला निर्णय येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. माघी पौर्णिमेच्या दिवशी श्री मलंगनाथ गडावर पुन्हा एकदा भक्ती, आस्था आणि उत्सवाच्या संगमाने उजळून निघाला आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर सांगितले.

राज्यभरातून तसेच परराज्यातूनही हजारो-लाखो भाविक मलंगनाथाच्या दर्शनासाठी मलंगगडावर दाखल होत आहेत. नाथांच्या समाधीचे दर्शन घेत भक्त भावविवश होत असून, परिसरात दिवसभर “नाथांचा जयघोष” घुमत आहे. यात्रेनिमित्त संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.

यावर्षी यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले असून भाविकांसाठी फ्युनिक्युलर (रोपवे) सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वयोवृद्ध, महिला आणि चालण्यास अडचण असलेल्या भाविकांनाही सहजपणे मलंगनाथांचे दर्शन घेता येत आहे. पूर्वी दर्शनापासून वंचित राहणाऱ्या अनेक भक्तांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी सुरू केलेली ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्याचे काम आजही भक्त आणि सेवाभावी संस्था करत असून, यात्रेचा अनुभव अधिक सुखकर आणि सुरक्षित बनवण्यावर भर दिला जात आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मलंगगड परिसरातील मालमत्तांबाबत न्यायालयात प्रकरण सुरू असून, लवकरच यावर न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *