पुण्यात आणखी एक हुंडाबळी !

0
IMG-20260127-WA0120

पुण्यात आणखी एक हुंडाबळी !

पुणे दि. २९ जानेवारी –
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दीप्ती मगर हिच्या कुटुंबीयांची भेट घेत न्याय मिळवून देण्यासाठी आयोग आपल्या सोबत असल्याचा विश्वास दिला. तसेच पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासाचा आढावाही घेतला. 

पुण्याच्या हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथील विवाहिता दीप्ती मगर चौधरी हिने सासरकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. माहेरून पैसे आणण्यासाठी सदर पीडितेला वारंवार त्रास दिला जात होता. गर्भधारणा झालेली असताना मुलीचा गर्भ असल्याने जबरदस्ती गर्भपात करत स्त्री भ्रूण हत्या ही करण्यात आली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या घटनेची दखल घेत स्वतः पोलिस उपअधीक्षक यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत विशेष पथक तयार करत आरोपींना अटक करण्याचे आणि सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. 

आज आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दीप्ती मगर हिच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांनी दीप्ती ला झालेल्या त्रासाबाबत सविस्तर माहिती दिली. दीप्तीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग आपल्या सोबत असल्याचे चाकणकर यांनी यावेळी सांगितले.

याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आत्तापर्यंत झालेल्या तपासाबाबतही आढावा आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला. आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पथकाने आरोपी पती रोहन चौधरी आणि सासू सुनिता चौधरी यांना अटक केली असून मा. न्यायालयाने ३१ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अजूनही फरार असलेले सासरे व दीर यांचा शोध पथकद्वारे तपास सुरू आहे. दीप्ती हिच्या कुटुंबीयांना दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये अजून काही बाबी समाविष्ट करावयाच्या असल्यास त्यादृष्टीने कार्यवाही करावी तसेच आवश्यकतेनुसार अधिकची कलमे जोडावी अशा सूचना यावेळी पोलिसांना देण्यात आल्या आहेत. 

यावेळी यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर पत्की, आरोग्य विभागाच्या जिल्हा विधी सल्लागार ॲड मेघा सोनसळे, पुणे जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, पुणे उपविभागीय पोलीस अधिकारी दडस, उरळीकांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सामाजिक कार्यकर्ता निलेश मगर आदी उपस्थित होते. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *