रेस्टॉरंटस् आणि बार सुरु होणार पण…..
मुंबई, दि. ३ ऑक्टोबर :
राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत आज आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली. मिशन बिगीन अगेन अंतर्गत येत्या ५ ऑक्टोबरपासून ५० टक्केपेक्षा जास्त नाही इतक्या क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे.
या आहेत सूचना…..
कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेश द्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा.
सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.
ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा.
ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
डिजीटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी.
शक्य असल्यास दारे, खिडक्या खुल्या ठेवून शुद्ध हवा आत येऊ द्यावी, एसीचा वापर टाळावा.
क्युआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहीत मेनुकार्ड उपलब्ध करावे.
कापडाच्या नॅपकिनऐवजी चांगल्या दर्जाच्या विघटनशील पेपर नॅपकिनचा वापर करावा.
टेबलांच्यामध्ये किमान १ मीटर अंतर राहील याप्रमाणे आवश्यक बदल करण्यात यावा.
मेनुमध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा.
शक्य असल्यास सलाडसारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत.
प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर त्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
टेबल, खुर्च्या, काऊंटर आदी जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
बुफे सेवेला परवानगी नसेल. जिथे शक्य असेल तिथे मेनुमध्ये प्री–प्लेटेड डिशेसना प्रोत्साहन देण्यात यावे. प्लेटस्, चमचे आदी सर्व भांडी गरम पाण्यात आणि संमत असलेल्या मान्यताप्राप्त डिसइन्फेक्टंटनी (जंतुनाशक) धुवावीत.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आदी माहिती घेण्यात यावी.
कर्मचाऱ्यांची नियमीत कोव्हीड चाचणी करणे
अत्यावश्यक आहे. एन ९५ किंवा याच दर्जाचा मास्क कर्मचारी वापरतील याची खात्री करावी.
परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दिवसातून दोनवेळा परिसर सॅनिटाईज करावा.
सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे.
