धर्मांध व विभाजनकारी शक्तींचा डाव ओळखा.
धर्मांध व विभाजनकारी शक्तींचा डाव ओळखा.
मुंबई, दि. २६ जानेवारी..
राज्यात काही लोक जात, धर्म, भाषा, प्रांत या मुद्द्यावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. इंग्रजांनी फोडा व राज्य करा निती वापरून राज्य केले त्याच नितीचा वापर काही लोक करत आहेत, अशा लोकांचे षडयंत्र ओळखा. देशाला स्वातंत्र्य मिळल्यानंतर आपण लोकशाही व संविधान स्विकारले आहे, हा देश संविधानाने चालतो व संविधानावरच चालेल, त्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
मुंबई काँग्रेस कार्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्या म्हणाल्या की, संविधानाची मूल्ये ही काँग्रेस पक्षाची मूल्ये आहेत. आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनी संविधानिक मूल्यांचे आणि आपल्या स्वातंत्र्यांचे रक्षण करण्याची गरज आहे. संविधान हे भारतातील लोकशाहीचे प्रतिबिंब आहे, सामान्य माणसाच्या हक्कांसाठी उभे राहणे, अन्यायाविरोधात आवाज बुलंद करणे आणि समान संधींचा भारत घडवणे हीच काँग्रेसची भूमिका आहे. लोकशाही मजबूत राहावी, समाजात बंधुता नांदावी आणि प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा, यासाठी काँग्रेस नेहमीच जनतेच्या सोबत उभी राहील, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
*भाजपा फक्त नावं बदलणारा पक्ष*..
भारतीय जनता पक्ष विकासाचे काम करत नाही. समाजिक सलाखो बिघडवणे व नावं बदलणे एवढेच काम या पक्षाचे सरकार करत आहे. महायुती सरकारचे एक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम हॉस्पिटलच्या नावातील एडवर्ड शब्द काढावा असे म्हटले आहे. हा शब्द बदलला तरी मुंबईकरांना या रुग्णालयातून मिळणाऱ्या सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळाणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. आधी मुंबईकरांना शिक्षण, आरोग्य, पाणी, सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी सुविधा चांगल्या दर्जाच्या पुरवण्यावर भर द्या. पण भाजपाला विकास नको आहे त्यांना फक्त विवादच हवा आहे, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
*सर्व उपनगरीय स्थानकांवर रुग्णवाहिका ठेवा*…
मुंबई लोकलमध्ये प्राध्यापक आलोकसिंग यांच्यावर झालेला चाकू हल्ला हा भयानक व चिंताजनक बाब आहे. जखमी आलोकसिंग यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध असती, तर त्यांचे प्राण वाचवता आले असते. तसेच तपासाच्या नावाखाली त्यांना तब्बल एक तास थांबवून ठेवण्यात आले. उपचारासाठी ट्रेनने त्यांना बोरिवलीला नेण्यात आले. या निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव गेला, हा हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. काही महिन्यांपूर्वी, राम मंदिर स्थानकावर एका सहप्रवाशाला व्हॉट्सॲपवरून डॉक्टरांशी संपर्क साधावा लागला होता आणि प्लॅटफॉर्मवरच एका महिलेची प्रसूती करण्यात मदत करावी लागली होती. रेल्वे स्थानकांवरील अशा घटनांना तोंड देण्यासाठी सर्व उपनगरीय स्थानकांवर रुग्णवाहिका उपलब्ध असाव्यात, अशी मागणी अनेकवेळा केली आहे पण रेल्वे व स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्याने पहात नाही,असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
