दावोसमधील ‘ते’ करार हा एक क्रूर विनोद..
दावोसमधील ते करार हा एक क्रूर विनोद..
मुंबई, दि. २५ जानेवारी २०२६ ;
दावोसमध्ये अदानी आणि लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार करणे हा एक क्रूर विनोद आहे. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत. आत्तापर्यंतच्या दाव्होस मध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे.
फडणवीस यांच्या दावोस दौ-यावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्होस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे MoU झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे.
पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच.
मागील दाव्होस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगार निर्मिती महत्त्वाची आहे.
आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दाव्होस मध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात कि आम्ही दाव्होससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा तास्त आहे असे चव्हाण म्हणाले..
