IMG-20201003-WA0092

जालनामधील अतिवृष्टी झालेल्या भागांना दिली भेट.
जालना दि. ३ ऑक्टोबर:
मराठवाड्यातील अतिृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून देशोधडीला लागलेला शेतकरी आजही शासनाकडून मदतीची वाट बघत आहे, पण संवेदनहीन सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, या सरकारने बळीराजाला वा-यावर सोडले आहे, अशा तीव्र शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शेतकरीविरोधी सरकारचा निषेध केला आहे.
मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या दरेकर यांनी आज जालन्यात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मराठवाड्यातील भीषण वास्तव मांडताना दरेकर म्हणाले की, ज्या प्रकारे शेतकरी उद्ध्वस्त झाला त्यावर सरकारने गतीने उपाययोजना करणे आवश्यक होते, पण तसे काही झाले नाही. मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अश्या प्रकारचा अभूतपूर्व पाऊस पडला आहे. एकीकडे धरणे भरली आहेत त्याचा आनंद होत आहे पण दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाल्याचे दुःख बघायला मिळत आहे. सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस मराठवाड्यात झाला आहे. या पावसामुळे गावं उद्ध्वस्त झाली आहेत.
साधारण ३ लाख ८९ हजार शेतकरी बांधव नुकसानग्रस्त झाले आहेत. सरकारी आकड्यांमध्ये ही संख्या तीन लाखावर आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मोसंबी, तुर पिकांची पिके उद्ध्वस्त झाली. जून,जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर चार महिने झाले तरी पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की सरसकट पंचनामे करा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करा. भाजपच्या वतीने जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण ही मागणी केल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी बागायतदार शेतकऱ्यांना ५० हजार प्रति हेक्टर तर कोरडवाहू शेतकऱ्यांना २५ हजार प्रति हेक्टरी मदत करण्याची मागणी केली आहे. तसेच सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पीक विम्यांचे पैसे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे अशा तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.

फुलंब्री, कन्नड या ठिकाणी ९० टक्के शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे भरले, परंतु त्यांना विम्याचे पैसे नाही मिळाले. जालना मधील बदनापुर, रोशनगाव मधील शेतकऱ्यांनाही विम्याचे पैसे मिळाले नाहीत. असा भोंगळ कारभार या ठिकाणी चालू आहे. विमा कंपनी म्हणते शासनाकडून जे पंचनामे केले जातील ते आम्ही ग्राह्य धरणार नाही. आमची माणस प्रत्यक्षपणे तिथे जाऊन तपासणी करतील आणि त्यानंतर रक्कम ठरवली जाईल. म्हणजे अजून सहा महिने आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळवण्याकरता वाट बघावी लागेल. विमा कंपन्यांकडे यंत्रणा नाही, माणसं नाही अशात हे कधी पंचनामे करणार आणि कधी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देणार.
राज्याचे कृषी मंत्री अतिवृष्टीच्या दौऱ्यावर आले आणि निघून गेले, त्याच्या पलीकडे त्यांनी काहीच केले नाही पण आज भाजपाच्यावतीने मी येथे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलो आहे.मराठवाड्यात उद्भवलेली परिस्थिती भयंकर आहे.
सरकार येण्यापूर्वी प्रचाराला जेव्हा उध्दव ठाकरे दौऱ्यावर आलेले होते तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना ५० हजार प्रति हेक्टर मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. दुसरी अतिवृष्टी झाली तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही, याचे स्मरण करुन देताना दरेकर यांनी सांगितले की, त्यावेळी शिवसेनेने विमा कंपनीचे कार्यालय फोडले होते, मोर्चे काढले होते आज विम्याची काय परिस्थिती आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, त्यामुळे शिवसेनेच्या कृतीबददलचा तीव्र असंतोष शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि या असंतोषाचा बांध फुटू नये याची काळजी शासनाने घ्यावी अशी टीकाही त्यांनी केली.
जालना दौ-यात दरेकर यांनी बदनापूर तालुक्यातील घोपटेश्वर, रोषणगाव तसेच जालना तालुक्यातील गोलापांगरी,अंतरवाला येथील अतिवृष्टी झालेल्या व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. तेथील शेतक-यांशी संवाद साधला व त्यांची नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी सरकारकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *