महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत NRI नी सहभाग घ्यावा!

0
IMG-20201003-WA0089

मुंबई, दि ३ ऑक्टोबर :
महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासीय भारतीय त्यांचे उद्योग व्यवसाय राज्यात स्थापित करू शकतात व त्याद्वारे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घेऊ शकतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आखाती देशातील अनिवासीय मराठी भारतीयांना दिला.

आखाती देशातील अनिवासी मराठी भारतीयांच्या विविध संघटनांनी शरद पवार यांच्याशी ऑनलाईन मीटिंगद्वारे संवाद साधला. शिवाय येथील मराठी अनिवासी भारतीयांच्या काही समस्यांसंदर्भात शरद पवारांनी चर्चा केली.
‘स्टार्ट-अप महाराष्ट्र’ या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा अनिवासीय मराठी भारतीयांना लाभ मिळण्यासाठी अनिवासीय मराठी भारतीयांची आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांसंबंधी या बैठकीत चर्चा झाली.नव्या संकल्पनांवर काम करणाऱ्या स्टार्ट-अप उद्योजकांसाठी महाराष्ट्र सरकार आर्थिक सहाय्य व शासन कामकाजात संधी देऊन प्रोत्साहन देते. नवउद्योजकांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सिडबीच्या सहयोगाने व्हेन्चर कॅपिटल सुविधाही उपलब्ध असल्याचे शरद पवार यांनी त्यांना सांगितले.
अनिवासीय मराठी भारतीयांनी गुंतवणूक करावी म्हणून महाराष्ट्र सरकारने ईझ ऑफ डुईंग बिझिनेस अंतर्गत तात्काळ एकल परवाना (महापरवाना), जागेची सहज उपलब्धता, गुंतवणूक रकमेइतका परतावा, सूक्ष्म व लघु उद्योग तसेच महिला उद्योगांसाठी वाढीव प्रोत्साहन योजनांची माहितीही शरद पवारांनी त्यांना दिली. या सर्व सुविधा सहज मिळाव्यात म्हणून एक खिडकी संकल्पने प्रमाणेच ‘मैत्री गुंतवणूक’ कक्ष स्थापण्यात आल्याचेही त्यांना सांगितले. [email protected] या ई-मेलद्वारे मैत्री कक्षाशी संपर्क साधता येईल अशी माहिती या बैठकीत दिली.
आखाती देशांमधून परत येणाऱ्या अनिवासीय भारतीयांसाठी महाराष्ट्र सरकारच्या महाजॉब्स पोर्टलवर अनिवासीय भारतीयांच्या नोंदणीसाठी काही योजना उपलब्ध आहेत. या योजनांच्या व्याप्तीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. कुशल कामगारांच्या एम्प्लॉयमेंट काँट्रॅक्ट्सची पडताळणी, मराठी अनिवासी भारतीयांसाठी एनआरआय सेल याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *