मनपा निवडणुकीत ‘….सबसे बड़ा रुपैया’.
मनपा निवडणुकीत ‘…..सबसे बड़ा रुपैया’.
मुंबई, दि. ५ जानेवारी २०२६ ;
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री अँड फेअर निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून पैशाचा खेळ सुरु आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरु असून भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’चे वगनाट्य जोरात सुरु आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, निवडणुका या काही नवीन नाहीत, निकोप लोकशाहीत विरोधी पक्षांनाही तेवढेच महत्व आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रिमंडळात सहा बिगर काँग्रेसचे मंत्री होते, ही आपली संस्कृती व परंपरा आहे पण विरोधकच नको अशी प्रवृत्ती भाजपा व महायुतीची बनली असून त्यातून बिनविरोधसाठी सत्ताधारी कोणत्याही स्तराला जात आहेत. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला अर्ज भरू न देणे, धमक्या देणे, दबाव तंत्राचा वापर करणे त्याचबरोबर पोलीस, प्रशासन यांच्या मदतीने बेशरमपणाचा खेळ सुरु आहे आणि निवडणूक आयोग मात्र याचा मूक साक्षिदार बनला आहे, याचा आम्ही निषेध करतो.
लोकशाहीत संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ‘नोटा’चा पर्यायही आहे, बिनविरोधच्या ठिकाणी मतदारांना ‘नोटा’ वापरण्याची संधी द्यावी, असे सपकाळ म्हणाले.
