भाजप -शिवसेना कोटयातील जागा RPI ला..

0
IMG-20251231-WA0060

भाजप -शिवसेना कोटयातील जागा RPI ला..

मुंबई दि १  जानेवारी २०२६ ;

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला हव्या असणा-या महत्वाच्या जागा भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाच्या कोटयातून रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमीत साटम आणि प्रविण दरेकर यांना निर्देश दिलेले आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातीलही काही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात येणार आहेत. रिपब्लिकन पक्षाने 17 जागांची अंतीम यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली. त्यातील किमान 12 जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात येणार आहेत. अन्य जागांवर रिपब्लिकन पक्षांची मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

मुंबई मनपाच्या उर्वरित 197 जागांवर रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटकपक्ष म्हणून महायुती उमेदवारांचा प्रचार करणार अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भेटलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, युवक आघाडी अध्यक्ष पप्पु कागदे, एम एस नंदा, हेमंत रणपिसे सचिनभाई मोहिते, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटवात रिपब्लिकन पक्षाला एकही जागा देण्यात आली नसल्यामुळे रिपब्लिकन पक्ष नाराज होता, या नाराजीतुन रिपब्लिकन पक्षाच्या 30 उमेदवारांनी स्वबळावर मुंबई महानगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. 30 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्वबळावर निवडणुक लढत आहेत. त्यातील 17 जागांची अंतीम यादी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली.

भाजपच्या कोटयातील 6 ते 7 जागा सोडण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमती दिली असून तसे निर्देश त्यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम आणि प्रविण दरेकर यांना दिले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोटयातीलही रिपब्लिकन पक्षाला हव्या असणा-या 6-7 जागा सोडण्यात येणार आहेत. त्याविषयी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार आहे.

उर्वरित 18 जागांवर रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणुक लढणार आहे. भाजप शिवसेना कोटयातुन 6-6 अशा 12 जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात येतील. त्या 12 जागांवरील भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार माघार घेतील. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना महायुतीचा पाठिंबा राहील. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाचे 12 उमेदवार निवडणुक लढतील. उर्वरित उमेदवार हे रिपब्लिकन पक्षाचे स्वबळावर निवडणुक लढतील.

30 जागांच्या व्यतिरीक्त मुंबईतल्या सर्व 197 जागांवर रिपब्लिकन पक्ष भाजप-शिवसेना महायुतीचा प्रचार करेल आणि त्यांना पाठींबा देईल, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या विविध मागण्यांचे निवेदनही सुपुर्द केले. रिपब्लिकन पक्षाला 2 विधान परिषद सदस्य, 60 महामंडळाचे सदस्य, तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 स्वीकृत सदस्य देण्यात यावेत अशी मागणी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी झालेल्या चर्चेनंतर रिपब्लिकन पक्षाचे समाधान झाले असून महापालीकेत झालेली नाराजी दुर झालेली आहे. महायुतीचा रिपब्लिकन पक्ष प्रचार करेल. रिपब्लिकन पक्षाला किमान 12 जागा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या भाजप आणि शिवसेनेच्या कोटयातील 12 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणुक लढणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *