IMG_20200828_233558

मुंबई, दि. २ ऑक्टोबर :
कोरोनाची स्थिती अजूनही बदललेली नाही. जम्बो कोविड सेंटरमधला सावळा गोंधळ, खाजगी रुग्णालयांकडून होत असलेली भरमसाठ बिल आकारणी याच्या तक्रारी येत असताना आता रेमेडिसिवीर हे औषध मिळत नाहीत असे चित्र आहे. यासंदर्भातच विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या औषधाचा साठा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात, ‘राज्यात दर दिवशी सरासरी सुमारे २० हजार करोना रुग्णांची भर पडत आहे. सरासरी ४५० ने दररोज बळीसंख्या वाढते आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचे औषध असल्याने त्याचा पुरवठा सुरळीत राहील, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्यानं गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले तरी रूग्णालयांकडून मात्र टंचाईचेच कारण रूग्णांना सांगितले जात आहे. त्यामुळे रूग्णालयांकडून रूग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितले जात आहे. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे.’

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबविली. परंतु ती प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यातून खरेदी केलेला औषध साठा परत करावा लागला, असं वृत्त माध्यमांमध्ये आले आहे. रेमडेसिवीर अभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. खरेदी योग्य झाली नसल्याने याच्या उपलब्धतेचा गुंता आणखी वाढला. परिणामी प्रचंड तुटवडा निर्माण झाला. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून, त्यामुळे गरिबांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अनेकांनी तर याचा गोरखधंदा सुरू केला आहे. एकीकडे गरीब रूग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरची काळाबाजारी ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सर्व गरीब रुग्णांना सरकारी तसेच खासगी रुग्णालयात सुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. याबाबत तातडीने आपण निर्देश प्रशासनाला द्यावेत आणि गरिब रूग्णांचे प्राण वाचवावे,” अशी मागणी फडणवीस केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *