मुंबई काँग्रेसचे महायुती विरोधात आरोपपत्र..

0
IMG-20251226-WA0173

मुंबई काँग्रेसचे महायुती विरोधात आरोपपत्र..

मुंबई, दि. २६ डिसेंबर ..

मुंबई महानगरपालिकावर तीन वर्ष नऊ महिने प्रशासकाचे राज्य होते, लोकप्रतिनिधी नव्हते. या प्रशासकाच्या माध्यमातून महायुतीने मुंबईकरांना लुटले आहे. मुंबईकरांना आज मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. केवळ कंत्राटदार व लाडके उद्योगपती यांना मुंबई विकण्याचे काम केले आहे, देशाच्या आर्थिक राजधानीची वाताहात केली आहे. मुंबई हे भ्रष्ट महायुती कार्पोरेशन बनले आहे, त्यांच्या कारनाम्याचे आरोपपत्र मुंबई काँग्रेसने आज प्रकाशित केले आहे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते वाल्मिकी नगर, वांद्रे पूर्व येथे आरोपपत्र प्रकाशित करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, चरणजित सप्रा, राष्ट्रीय सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, महायुतीने मुंबई महापालिकेच्या बँकेतील ठेवी लुटल्या, मुंबईत आज रस्त्यांची अवस्था बिकट आहे, रस्त्यावर खड्डे पडले आहेत, ट्रॅफिक, वायू प्रदुषण, सार्वजनिक वाहतूक, पाणी, आरोग्य, शिक्षण या सर्व मुद्द्यांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या शाळा खाजगी लोकांना दिल्या जात आहेत, घनकचऱ्याचा प्रश्न आहे, मीठी नदीचे काम कोणाला दिले आहे हे सर्वांना माहित आहे. मुंबईतील जागा विकण्याचा सपाटा लावला आहे, अनेक प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला.

मुंबई काँग्रेसने याविरोधात सातत्याने आवाज उठवला आहे. मुंबई काँग्रेस लवकरच जाहिरनामा प्रसिद्ध करणार आहे पण महायुतीने काय केले हे या चार्जसिटच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर आणले आहे. मुंबईची निवडणूक ही जात, धर्म, प्रांत वा भाषा या मुद्द्यावर नाही तर मुंबईच्या प्रश्नांवर झाली पाहिजे. मुंबईकरांना विवाद नको तर विकास हवा आहे, असे खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.

आघाडीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, वंचित व इतर समविचारी पक्षांबरोबर आमची संवाद सुरु आहे, लवकरच त्यासंदर्भात निर्णय होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *