UBT साठी मुंबई सोन्याची अंडं देणारी कोंबडी..
UBT साठी मुंबई सोन्याची अंडं देणारी कोंबडी..
मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ :
पंचवीस वर्ष सत्तेत असणाऱ्या उबाठासाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी होती, अशी खरमरीत टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोविडमधला खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर, बॉडीबॅग घोटाळे करणाऱ्यांनी टोमणे मारण्यापेक्षा स्वत:मध्ये डोकावून बघावे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
नगर परिषदांच्या निकालांमधून शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत विस्तारली आहे. घराघरात धनुष्यबाण पोहोचवल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले की, लोकसभेत शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. विधानसभा निवडणुकीतही स्ट्राईक रेट इतर पक्षांच्या तुलनेत चांगला होता. आता कमी जागा लढून जास्त जागा जिंकलो हा देखील चांगला स्ट्राईक रेट आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमदार नसलेल्या ठिकाणीही शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, असे ते म्हणाले.
राज्यात शिवसेनेचे ६२ नगराध्यक्ष निवडून आले असून हा आकडा ७० पर्यंत वाढेल, असे ते म्हणाले. यात शिवसेनेच्या ३३ लाडक्या बहिणी नगराध्यक्षपदी निवडून आल्या, असे ते म्हणाले. नगर परिषद निवडणुकीत उबाठा आणि महाविकास आघाडीने पराभव मान्य केला होता. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं. जे घरी बसले त्यांना कायमचे घरी बसवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेनं केलं, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली.
महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बेरजेपेक्षा शिवसेनेच्या नगराध्यक्षांची संख्या अधिक आहे. सर्वसामान्यांची नाळ शिवसेनेची जोडलेली आहे, ती कधीही तुटू शकत नाही. शिवसेनेला हरवणं अशक्य आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महापालिका निवडणुकीत देखील महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
