BMC निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार..

0
IMG-20251220-WA0190

BMC निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार..

मुंबई, दि. २० डिसेंबर.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्या अशी कार्यकर्त्यांची भावना आहे म्हणून मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई काँग्रेसच्या पॉलिटीकल अफेअर्स कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीत प्रभारी रमेश चेन्नीथला, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश, खासदार चंद्रकात हांडोरे, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान, आमदार अस्लम शेख, अमिन पटेल, ज्योती गायकवाड, भाई जगताप,सचिन सावंत, गणेश यादव, मधु चव्हाण, डॉ मन्हास सिंग आदी उपस्थित होते.

 

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील चार वर्षांपासून झालेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने या निवडणुका होत आहेत. निवडणुका व्हाव्यात अशी राज्य सरकारची इच्छाच नव्हती कारण सरकार थेट महापालिकेचा कारभार पहात होते. महानगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी केली आहे. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. भाजपा महायुती जनतेच्या प्रश्नावर लक्ष न देता हिंदू मुस्लीम वाद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे, भाजपाजा हाच अजेंडा आहे. काँग्रेस पक्ष सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहिनामा व चार्जसीट लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. बीएमसीमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल, असे चेन्नीथला म्हणाले.

 

यावेळी बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढवणार आहे. मुंबईकरांना धर्म, प्रांत, भाषेवरून होणाऱ्या वादात पडायचे नाही, मुंबईकरांना विवाद नको तर विकास हवा आहे आणि काँग्रेसचा भर जनतेच्या मुद्द्यांवरच असेल. काही शक्ती जाती धर्माच्या नावाखाली वाद निर्माण करत आहेत पण काँग्रेस पक्ष विकासावर लक्ष केंद्रीत करणार आहे. महनगरपालिकेची निवडणुक स्वबळावर लढवण्याचा निर्णय दोन महिन्यापूर्वी झालेल्या शिबिरातच झालेला आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष मजबुतीने निवडणुका लढणार असून प्रदुषण, पाणी, आरोग्य, कचरा, शिक्षण या मुलभूत विषयावर प्रचारात भर दिला जाणार आहे, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *