काँग्रेसचे सचिन पोटे शिवसेनेत ..
काँग्रेसचे सचिन पोटे शिवसेनेत ..
कल्याण, दि. १९ डिसेंबर २५ :
राज्यात पूर्वी स्थगितीचे सरकार होते, त्यामुळे विकास रखडला होता. मात्र आता राज्यात प्रगतीचे सरकार काम करत असून सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. काँग्रेसचे नेते सचिन पोटे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट झाला असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस समितीचे गेल्या नऊ वर्षांचे जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक तसेच महापालिका प्रचार प्रमुख असलेले सचिन पोटे यांनी आज आपल्या असंख्य समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी त्यांच्यासह मनसेचे राज्य सरचिटणीस कौस्तुभ देसाई, मनसेच्या माजी नगरसेविका कस्तुरी देसाई उबाठा गटाच्या कल्याण पूर्व शहरप्रमुख आशा रसाळ, माजी नगरसेवक फैजल जलाल यांच्यासह काँग्रेस आणि मनसेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सचिन पोटे हे लढवय्ये आणि प्रामाणिक कार्यकर्ते असून त्यांनी काँग्रेसमध्ये काम करत असताना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध जपले. निवडणुका संपल्यानंतर पक्षभेद विसरून विकासासाठी एकत्र काम करणे हीच खरी शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना हा ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारा पक्ष असून बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती देताना शिंदे यांनी सांगितले की, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, उड्डाणपूल, पादचारी पूल, एस्केलेटर, क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, तसेच हक्काचे आणि दर्जेदार घर देण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. कल्याण पूर्व-पश्चिम जोडणारा साडेतीनशे कोटींचा उड्डाणपूल, ८०० कोटींचे विविध प्रकल्प आणि भविष्यातील डबल डेकर रस्ता व मेट्रोसारख्या योजना या परिसराचा चेहरामोहरा बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना ही राज्यातील सर्वात लोकाभिमुख योजना असून ती कधीही बंद होणार नाही, असा ठाम विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असल्याचेही त्यांनी सांगितले.
सचिन पोटे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची महायुतीची टीम अधिक मजबूत झाली असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करून विकासाच्या अजेंड्यावर एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पश्चिम जिल्हाप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक निलेश शिंदे, माजी नगरसेवक नितीन पाटील, सागर जेधे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
