नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचा ED ऑफीसवर मोर्चा..
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचा ED ऑफीसवर मोर्चा..
मुंबई, दि. १८ डिसेंबर..
नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने निकाल दिल्यानंतर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ईडी हे नरेंद्र मोदी सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असून सोनियाजी व राहुलजी गांधी यांना चौकशीच्या नावाखाली त्रास देण्यात आला. भ्रष्टाचाराचे आरोप करून काँग्रेस पक्ष, सोनियाजी व राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यात आले. भाजपा सरकारने काँग्रेस नेतृत्वाला जाणीवपूर्वक व राजकीय सुडबुद्धीने गोवण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने निकाल दिला आहे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनियाजी व राहुलजी गांधी यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात आमदार मा. मंत्री अस्लम शेख, डॉ. ज्योती गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, जिल्हाध्यक्ष रविकांत बावकर, कचरू यादव, केतन शाह, भावना जैन, अर्शद आझमी, राजपती यादव, ट्युलिप मिरांडा, सुभाष भालेराव, फरहान आझमी, अखिलेश यादव, राजेश शर्मा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा सरकारने मोर्चाला अडवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कशाचीही तमा न बाळगता सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले.
“देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी बलिदान दिले आहे, त्याग केला आहे, त्यांच्यावर खोटे आरोप लावून बदनाम करण्याचे पाप करु नका हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ईडी नेही लक्षात ठेवावे. अशा प्रकारे काँग्रेस नेतृत्वाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून चोख उत्तर देईल’, असा इशारा यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.
