गुंतवणुकदारांचा महाराष्ट्रावरच विश्वास, १६ हजार कोटींची गुंतवणूक.
कोरोना संकटातही उद्योगपतींचा महाराष्ट्रावरच विश्वास.
१६ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगार.
मुंबई, दि.१५ जून २०२० (XXL News Team)
कोरोनाच्या संकटामुळे उद्योगधंद्यात आलेली मरगळ आता झटकली जात असून महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योगपतींच्या, गुंतवणूकदारांच्या विश्वासास पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० मधून १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या गुंतवणुकीतून राज्यात जवळपास ९० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करु आणि यापुढेही राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार, उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते. विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांसोबत १६ हजार ३० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले आहेत. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. या उद्योगांसाठी राज्यात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवलेली आहे. विविध परवान्याऐवजी आता ४८ तासांत महापरवाना दिला जाणार आहे. याशिवाय औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाणार आहे अशी माहितीही देसाई यांनी दिली आहे.
